Uddhav Thackeray, Satish Harde Shivsena
Uddhav Thackeray, Satish Harde Shivsena Sarkarnama
विदर्भ

माजी जिल्हाप्रमुख हरडे म्हणतात, सच्चा शिवसैनिक बंडखोरांना घरी बसवेल...

अतुल मेहेरे

नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले आहे. या बंडामुळे अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिवसैनिक उभा होताना दिसतो आहे. बंडखोर आमदारांनी आता त्यांच्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

काल सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. हे करताना ते भावूकही झाले, यात त्यांनी बंडखोर आमदारांनाही साद घातली. तुम्ही म्हणत असाल तर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पक्षप्रमुख ही दोन्ही पदे मी आत्ताच्या आत्ता सोडायला तयार आहे. तुम्ही फक्त माझ्या समोर येऊन एकदा बोला आणि माझे राजीनामा पत्र राज्यपालांकडे (Governor) घेऊन जा, असे आवाहनही त्यांनी बंडखोर आमदारांना केले. उद्धव ठाकरेंचा हा प्रामाणिकपणा आणि विनयशीलता बघून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला, असे वक्तव्य एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले मत, हेच राज्यातील बव्हंशी जनतेचे मत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नागपूर जिल्ह्याचे दोन वेळा जिल्हाप्रमुख आणि गोंदीया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राहिलेले सतीश हरडे यांनी व्यक्त केली. ‘सरकारनामा’शी बोलताना सतीश हरडे म्हणाले, आज जे लोक बंडाळी करून गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसलेले आहेत, त्यांना आमदार आणि नामदार शिवसेनेनेच केले, हे त्यांनी विसरू नये. बनवणारा बिघडवूही शकतो, हेसुद्धा बंडखोरांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. हे जेवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल, तेवढे त्यांच्यासाठी चांगले.

उद्धव ठाकरे सरळ, सज्जन व्यक्ती..

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरळ मार्गी आणि सज्जन व्यक्ती आहेत. धोकेबाजी त्यांना पसंत नाही. कुठलेही अवघड काम जिद्दीने पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच २०१९ मध्ये भाजपने दिलेला धोका ते सहन करू शकले नाही आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वेगळी वाट धरली. गेल्या अडीच वर्षात त्यांनी उत्तम कार्य केले आहे. म्हणून ५ बेस्ट सीएम मध्ये त्यांचा समावेश झाला. सरळमार्गी उद्धव ठाकरें बंडखोरांना ओळखू शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर आजची वेळ आली असल्याचे हरडे म्हणाले.

बंडखोरांना धडा शिकवू..

शिवसेनेच्या जिवावर मोठे होऊन आज जे बंडखोरी करून बसले, त्यांना आमच्यासारखा सच्चा शिवसैनिक सोडणार नाहही. आत्ताच नाही, पण मतदारसंघात परत आल्यावर वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येईल. आज काय करायचे, ते करतीलही. पण अडीच वर्षांनंतर सच्चा शिवसैनिक बंडखोरांना त्यांच्या मतदारसंघात निवडून येऊ देणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या कृत्यावर पश्चात्ताप होईल.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आमच्यासोबत..

या बंडाळीच्या परिस्थितीतही महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. समजा भाजपसोबत मिळून बंडखोरांनी सरकार बनवले. तरीही अडीच वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेव्हा यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोरांना महाविकास आघाडी घरी बसवेल, हा निर्धार आम्ही केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अडीच वर्षांनंतर जेव्हा एकत्र येऊन लढेल, तेव्हा या सर्वांचा धुव्वा उडवेल, असा विश्‍वास सतीश हरडे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT