Sanjay Gawande, Former MLA Shiv Sena

 

Sarkarnama

विदर्भ

‘या’ तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य !

सरकारनामा ब्यूरो

अकोट : अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधत्व करणारे माजी आमदार संजय गावंडे (Sanjay Gawande) हे मरोडा ग्रामपंचायतचे सदस्य झाले आहेत. ते अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) राजकारणासाठी माजी आमदारांनी उलटा प्रवास करीत ग्रामपंचायत निवडणूक लढविल्याची चर्चा आहे.

अकोट तालुक्यात तेहत्तीस ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीमध्ये माजी आमदार संजय गावंडे व पत्रकार चंद्रकांत पालखडे यांच्यासह १८ उमेदवार अविरोध निवडून आले. पाच ग्रामपंचायतींमध्ये सात सदस्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ८२ मधील ४२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही तर पंचावन्न उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यामध्ये ओबीसीच्या १० जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. अकोट तालुक्यात ८२ जागांसाठी ३३ ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यामधील अठरा ग्रामपंचायतमध्ये केवळ एक एक नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने १८ उमेदवार बिनविरोध झाले.

बिनविरोध झालेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा निवडणुका पार पडल्यानंतर होत असली तरी केवळ एका नामनिर्देशनपत्रा वरून त्यांची अविरोध निवड निश्चित झाल्याचे सर्वश्रुत आहे. यावेळच्या पोटनिवडणुकीमध्ये निरुत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसीच्या १० जागांवरची निवडणूक अकोट तालुक्यातसुद्धा स्थगित करण्यात आली. ८२ जागांमधून ४२ ठिकाणाचे नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्याने पंचावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील १८ उमेदवार अविरोध झाले आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सात जागांसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. एकंदरीत पोटनिवडणुकीत स्वारस्य असल्याचे दिसून आले नाही. मात्र, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडणूक येण्यासाठी तालुक्यातील दिग्गजांनी राजकारणाचा उलटा प्रवास करीत ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उडी घेतल्याचे बघावयास मिळाले.

माजी आमदारांचे पॅनल..

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्‍या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे सर्वेसर्वा माजी आमदार संजय गावंडे यांनी मरोडा ग्रामपंचायतमध्ये तर वनी ग्रामपंचायतमध्ये वनी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास पॅनलचे प्रमुख चंद्रकांत पालखडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. माजी आमदार गावंडे व पत्रकार पालखडे यांच्यासह १८ उमेदवार अविरोध झाले आहे. गावंडे व पालखडे हे ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने पुढे होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकबाबत चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT