Eknath Shinde, Vidarbha
Eknath Shinde, Vidarbha Sarkarnama
विदर्भ

Vidarbha : कॉंग्रेसचे चार माजी आमदार जाणार शिंदेसेनेत, युवा सेनेलाही खिंडार...

Atul Mehere

नागपूर : कॉंग्रेसचे (Congress) काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सातत्याने सांगितले जात आहे. त्याला अजून अवकाश असला तरी कॉंग्रेसचे चार माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार, हे जवळपास पक्के झाले आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे आठ जिल्हाप्रमुखही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात दाखल होणार आहेत.

रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विदर्भात असून गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या माध्यमातून ते पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची चाचपणी करणार असल्याचे समजते. युवासेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यास काही कारणाने विलंब झाला. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ विदर्भातील (Vidarbha) आठ जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येतील. हा प्रवेश सोहळा, हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात होणाऱ्या मेळाव्यात होईल.

काँग्रेसचे चार माजी आमदारही आमच्या संपर्कात आहेत. तेही याच दरम्यान प्रवेश करतील, असे तुमाने यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख अथवा माजी आमदारांची नावे मात्र त्यांनी गुपित ठेवली. मात्र चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील माजी आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड जेव्हा व्हायचे होते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकसंघ होती, तेव्हाही शिवसेनेचे फार प्राबल्य येथे नव्हते. नागपूर महानगरपालिकेत त्यांचे फक्त दोन नगरसेवक होते. त्यातही शिवसैनिकांमधील गटबाजीचीच चर्चा अधिक होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले होते. पण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचाही नागपूर किंवा विदर्भाला फारसा फायदा झाला नाही.

आता तर एकनाथ शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना फोडली आणि स्वतःचा बाळासाहेबांची शिवसेना हा गट घेऊन ते काम करत आहेत. शिवसेनेने कधी नव्हे, येवढे लक्ष ते विदर्भात घालत आहे. त्यांना तसा प्रतिसादही मिळतोय. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण अद्यापतरी तसे ठोस काम उद्धव सेनेकडून येथे झालेले नाही. संजय राऊत यांच्यावर जेव्हा नागपूरची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यांनी येथील शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण केला होता. पण त्यांना अटक झाल्यानंतर स्थिती पुन्हा जैसे थे झाली. आता अधिवेशनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव सेनेला खिंडार पाडणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून काय हालचाली होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT