Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

गडकरींनी ठरवले; नागपूर-हैदराबाद साडेतीन तासांत, तर पुण्यासाठीही होणार मोठा रस्ता !

Atul Mehere

नागपूर : रस्ते बांधकामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांच्या कामाचा वेग बघितल्यास आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. आता नागपूर ते हैदराबाद हे अंतर केवळ साडेतीन तासांत कापले जाईल आणि नागपूर-पुणे रस्ते मार्गाचा प्रवास कंटाळवाणा आहे. त्यामुळे हा रस्तासुद्धा प्रशस्त करण्यात येईल, असा निर्णय गडकरींनी घेतला आहे.

नागपूर- हैदराबाद सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेतीन तासात पार करता येणार आहे. केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा रस्ता प्रशस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हैदराबाद (Hyderabad) नागपूरच्या (Nagpur) अगदी शेजारी येणार आहे. नितीन गडकरी यांनी देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचा संकल्प केला आहे. येत्या वर्षांत देशभरात २५ हजार कोटींचे रस्ते निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. यात नागपूर आणि हैदराबाद मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या हैदराबादचे अंतर कापण्यासाठी रस्ते मार्गाने किमान आठ ते नऊ तास लागतात. त्यामुळे पूर्ण दिवसच जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रमाणेच हा मार्ग सुपरफास्ट करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआरसुद्धा तयार झाला आहे.

नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी फारशा चांगल्या सुविधा नाहीत. बसने १२ ते १५ तास लागतात. रस्ता आठपदरी नसल्याने आणखी उशीर होतो. रेल्वेच्या वेळाही गैरसोईच्या आहेत. दिवाळी, उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये खासगी ट्रॅव्हल्स नागपूर-पुणे प्रवास भाडे १० ते १२ हजार रुपये आकारतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड लूट होत असते. ही अडचण दूर करण्याचेही त्यांनी ठरवले आहे. समृद्धी मार्गाला जोडून जालनापासून ते नगर आणि पुण्याला जोडण्यासाठी एक मोठा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने जाण्या-येण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

खापरी रेल्वे स्थानक विकसित करणार..

अजनी रेल्वे स्थानकाच्या विकासाचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी आता खापरी रेल्वे स्थानक विकसित करण्याचा विचार केला जात आहे. याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. हे स्थानक विकसित केल्यास प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी सोयीचे होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT