Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Gadkari : गडकरी म्हणाले; सरकारवर फार अवलंबून राहू नका, अन् कारणही सांगितले...

सरकार आणि परमेश्‍वर कितीही असले तरी पाळणा काही हलणार नाही. त्यामुळे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असे नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : आपण जे उद्दिष्ट ठरवलेले आहे, त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व एजन्सीजची मदत घेऊन आपल्या धोरणांमध्ये, कृषी प्रबंधनामध्ये काय काय बदल करून पुढे जायचे आहे, त्याची प्रेरणा आपल्याला मिळावी. हा आजच्या कार्यक्रमामागील उद्देश आहे. उत्पादन वाढवण्यासाठी आपण कोणते खत वापरले पाहिजे, कलमा कशा तयार केल्या पाहिजे, याचा विचार कुणी करत नाही. पण काही शेतकरी असे आहेत की, ज्यांनी हे प्रयोग करून यशस्वी शेती करून दाखविली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

नागपुरात (Nagpur) ॲग्रोव्हिजनतर्फे आयोजित कार्यक्रमात आज गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. ते म्हणाले, माझ्या शेतात पिकवलेल्या भाज्या विकण्यासाठी माझे मार्केट मी शोधले. तुमचं मार्केट तुम्ही शोधा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या सरकारच्या (Government) भरवशावर फार राहू नका. मी सरकार आहे, म्हणून तुम्हाला हे सांगतो. आपला विश्‍वास एक तर सरकारवर आहे आणि परमेश्‍वरावर आहे. परमेश्‍वरावर आपला इतका विश्‍वास आहे की, मुलगा झाला की आपण सांगतो की परमेश्‍वराने दिला, त्याची कृपा आहे. अरे बाबा पण लग्न झाल्यावर तू काही कार्य केलं की नाही. परमेश्‍वराची कृपा तर आहेच. पण तू प्रयत्न केले नाही, तर सरकार आणि परमेश्‍वर कितीही असले तरी पाळणा काही हलणार नाही. त्यामुळे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असे नितीन गडकरींनी म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.

सोयाबीन लावण्याआधी ज्या शेतकऱ्यांनी सीड प्रोसेसिंग केले होते, त्यांच्या शेतांत सोयाबीन पिकावर रोग नाही आले. त्यामुळे आपल्याला आता यशस्वी प्रयोग करावे लागतील आणि ज्या शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या प्रयोग केले आणि प्रगती केली. अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि विदर्भभर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. जेणेकरून सर्वाना लक्षात येईल, की आपण कुठे चुकतोय आणि पुढे आपल्याला काय केले पाहिजे. लागत मूल्य कसे कमी करता येईल, याचाही विचार शेतकऱ्यांनी करून पुढे जाण्याची गरज गडकरींनी प्रतिपादित केली.

शेतकऱ्यांनी आता संघटित होण्याची गरज आहे आणि आज ॲग्रोव्हीजनमध्ये जे आले आहेत, ते सर्व चांगले प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. येथे कुणी सीताफळ, कुणी भाजीपाला उत्पादनात आघाडी घेतली आहे. म्हणून आपण फॉरमर प्रोड्यूस कंपनी त्या-त्या गावांत शेतकऱ्यांनी तयार केली पाहिजे. हे केल्यावर शेतकऱ्यांची ताकत वाढणार आहे. आता उसाकरिता हार्वेस्टर घेण्याची योजना आहे. या योजनेमध्ये मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सांगितले की, हे हार्वेस्टर कारखान्यांना देऊ नका, तर शेतकऱ्यांना द्या. शेतकरी त्याला आपले दोन ट्रॅक्टर लावतील पुढे मागे आपण ट्रॅक्टर सीएनजीवर चालवण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून इंधनाचा खर्च कमी होईल. यातून उसाचे ट्रान्स्पोर्टेशन होईल आणि शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त उरतील, असे गडकरींनी सांगितले.

नागपूर शहरातील तेलंगखेडी येथे नवीनच म्युझिकल फाउंटन तयार केले आहे. तेथे दुकानेही उपलब्ध आहेत. पण त्याचे उद्घाटन केल्यानंतर मी स्पष्टच सांगितले की, ती दुकाने इतर कुणालाही देऊ नका, तर विदर्भातील उत्पादकांनाच ती द्यावी. त्यामध्ये हॅन्डलूम, हॅन्डीक्राफ्ट, संत्रा, मोसंबी, संत्र्यांची बर्फी ही उत्पादने ज्यांची असतील अशांनाच ती द्यावी. तेथे आता शेतकऱ्यांसाठी एक हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. आता गोदरेज, रिलायन्स यासारख्या कंपन्या ही उत्पादने विकत आहे. तुमची उत्पादने आम्ही आमच्या सुपर बाजारामधून विकण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्‍वासनही गडकरींनी शेतकऱ्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT