Nagpur Political News : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीआधीच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष नेतृत्व बदलाच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चा झडत असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बढती मिळेल, असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गडकरी हे आणखी मोठ्या पदावर जातील, असे सूचक विधान वडेट्टीवारांनी केले. त्यामुळे गडकरी मोठ्या पदावर जाणार अर्थात, केंद्रात राहणार की, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होणार, याचीही चर्चा रंगण्यास वडेट्टीवारांची भविष्यवाणी कारणीभूत ठरू शकते.
नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित 'गडकरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गडकरींनी केलेले काम, त्यांचा संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जात आहे. गडकरींच्या कार्याची उंची फार मोठी आहे. परंतु त्यांना योग्य ते पद देण्यात आलेले नाही. गडकरी याहीपेक्षा मोठ्या पदावर जाऊ शकतात. सध्याच्या पदावरून त्यांना वरच्या पदावर जाण्यासाठी आमच्यादेखील शुभेच्छा राहतील. पुढे आमची म्हणजे 'इंडिया'ची सत्ता येणार आहे. सध्या गडकरींवर चित्रपट निघतोय. मात्र, खरा चित्रपट दाखवण्यासाठी गडकरींना भविष्यात 'इंडिया' सोबत यावं लागेल असं मला वाटतं, असे वडेट्टीवार म्हणाले.
केंद्र सरकारमध्ये काम करताना मोदी, शाह जोडीकडून नितीन गडकरी यांचे खच्चीकरण केले जात आहे, असे बोलले जाते. भाजपच्या काही समित्यांवरून गडकरी यांचे नाव कमी करण्यात आले आहे. हाच धागा पकडत वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देशातील सर्व पक्षांना चालणाऱ्या काही नेत्यांपैकी नितीन गडकरी हे एक नाव आहे. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी त्यांना 'त्या' वरच्या पदावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीतील शरद पवार गट, काँग्रेस या सर्वच पक्षांतील नेत्यांशी नितीन गडकरी यांचे संबंध सुमधुर आहेत. भविष्यात गडकरी 'त्या' मोठ्या पदाचे दावेदार झाल्यास त्यांना विरोध होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
देशभरामध्ये ज्या पद्धतीने महामार्गांचा विकास झाला, तो न भूतो ना भविष्यती असाच आहे. नितीन गडकरी यांच्या खात्याने केलेल्या या विकासामुळेच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि कामरू ते कच्छपर्यंतचा भारत एकमेकांशी जोडला गेला, हे गडकरी समर्थक ठामपणे सांगतात. मोदी सरकारमध्ये सर्वाधिक विकासकामे करणारा म्हणून गडकरी यांच्या विभागाचेच नाव घेतले जाते. परंतु असे असतानाही भाजपमध्ये गडकरींची कोंडी होत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्नही वडेट्टीवार यांनी केला.
ओजसचे कौतुक...
नागपूरच्या ओजसने तीन सुवर्णपदक जिंकत विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही विदर्भातील खेळाडू कमी नाहीत. सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताची मान विदर्भातील खेळाडूंनी सन्मानाने ताठ केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.