Yavatmal ZP
Yavatmal ZP Sarkarnama
विदर्भ

यवतमाळ झेडपीत कित्येक महिन्यांपासून सुरू होता जुगार; अखेर काल रात्री पडली धाड...

सरकारनामा ब्यूरो

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा परिषद (ZP) कार्यालय परिसरात जुगार (Gambling) खेळत असलेले कर्मचारी, वाहनचालक व निवृत्त चालक अशा ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री काही लोक जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली. त्यावरून त्यांनी धाड मारून ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काल रात्री कार्यालयाच्या परिसरात काही लोक जुगार खेळत होते. यामध्ये एक लिपिक, काही वाहनचालक, काही निवृत्त वाहनचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वाहन चालकाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. हा काही कालचाच प्रकार नाही, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून तेथे काही मंडळी जुगार खेळतात. तेथेच या मंडळीचा मद्यप्राशनाचाही कार्यक्रम नियमित होत होता, अशी माहिती आहे. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात डीआरडीएच्या कार्यालयानजीकचा परिसर सुनसान असतो. त्याचाच फायदा घेत तेथे हा प्रकार चालक होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली. ९ जणांवर गुन्हे दाखल केले आणि रात्री या जुगाऱ्यांना सोडून दिले. या लोकांना वाटले की आता सुटलो एकदाचे. पण आज सकाळी पुन्हा सर्वांना पोलिसांनी बोलावले आणि पुढील कारवाई केली. कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल केले, याची माहिती वृत्त लिहीपर्यंत मिळू शकली नाही. जुगाऱ्यांना अटक केली की नाही, हेसुद्धा कळू शकले नाही. पण पोलिसांच्या या कारवाईने शहरातील ‘खोपच्यांमध्ये’ जुगार खेळणारे आणि दारू पिणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. यापुढे असे प्रकार शहरात कुणीही करू नये, असा संदेश अवधुतवाडी पोलिसांनी कालच्या कारवाईतून शहरवासीयांना दिला आहे.

असा बनला जुगार अड्डा...

यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील सहसा निर्मनुष्य राहणाऱ्या या परिसरात काही जिल्हा परिषद कार्यालयातील काही निवृत्त वाहनचालक टाईमपास म्हणून पत्ते खेळत बसायचे. मग तेथे त्यांना काही नवीन सोबती मिळाले. ड्युटी संपल्यानंतर मग तेसुद्धा जाईन होत होते. मग रात्री उशिरापर्यंत तेथे जुगार चालत होता. यात काही मद्यप्रेमी असल्याने त्यांच्या मद्यप्राशनाचा कार्यक्रमही तेथेच चालत होता. कित्येक महिन्यांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता. त्यामुळे तेथे नियमित बसणारेही बिनधास्त होते. पण काल पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली आणि तेथे धाड पडली.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये काही कर्मचारी जुगार खेळत आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. या माहितीवरून धाड टाकली असता, तेथे काही लोक जुगार खेळत असताना आढळले. त्यांच्यापैकी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. यात जिल्हा परिषदेतील कर्मचारी, वाहनचालक यांचा समावेश आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

मनोज केदार, पोलिस निरीक्षक, अवधुतवाडी, यवतमाळ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT