नागपूर : चंद्रपुरातील सीएसटीपीएस येथील ३ आणि ४ क्रमांकाचा संच जुना असल्याने यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे हे संच बंद करण्यात यावे, तसेच चंद्रपुरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी केली आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा परिणाम केंद्राच्या चंद्रपूरसह थेट नागपूर, (Nagpur) पुणे (Pune) व मुंबईवर (Mumbai) होत असल्याचा दावा पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लिन एअर (सीआरईए) नामक संस्थेने केला आहे. सदर महाऔष्णिक वीज केंद्रातून निघणारे एस.पी.एम., सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि मर्क्युरीसारखे प्रदूषणकारी घटक हवेच्या माध्यमातून विदर्भांतील शहरांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावाही सदर संस्थेने आपल्या सर्वेक्षणात केला आहे.
वायू प्रदूषणामुळे २०२० मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ८५, नागपूर ६२, यवतमाळ ४५, मुंबईत ३० आणि पुणे व नांदेडमध्ये प्रत्येकी २९ जणांचा अकाली मृत्यू झाल्याचेही या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर विषयावर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहर हे पाच लक्ष लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज असून महाऔष्णिक वीज केंद्राचे मुदतबाह्य झालेले ३ आणि ४ क्रमांकाचे संच बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
येथे हवा शुद्धीकरण संयंत्र लावण्यासह या वीज केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणावर इतर उपाययोजनांच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. यावर उत्तर देताना सदर विषयासंदर्भात संबंधित विभागाची लवकरच बैठक लावणार असल्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.