Ramesh Kuthe join shivsena Uddhav Thackeray group Sarkarnama
विदर्भ

Thackeray Group: सहा वर्षांपूर्वी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलेल्या आमदाराची 'घरवापसी'; 'मशाल' हाती घेणार

Ramesh Kuthe join shivsena Uddhav Thackeray group: गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.

Mangesh Mahale

सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

2018 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 1995 आणि 1999 अशा दोन टर्म रमेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून अलिप्त होते.

गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा कुथे यांना होती, पण त्यांना भाजपकडून डावलण्यात आले, त्यामुळे ते नाराज होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरमध्ये विदर्भातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

"भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत, त्यांचे आम्ही आम्ही स्वागत करू, त्यातील पाच सहा जण पुन्हा जातील, पण अन्य लोक थांबतील," या विधानामुळे कुथे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आणि माझा निकटचा संबंध आहे. काही वर्षांपूर्वी नाना पटोले यांची भेट झाली होती. आमच्या पक्षाच्या तुमचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले होते. भाजप पक्षात घेतात, पण त्या ठिकाणी सन्मान मिळत नाही. त्यामुळे भाजपला रामराम ठोकत आहे, असे कुथे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांना गोदिंया मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरविणार का? हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT