Vijay Rahangadale, Gondia.
Vijay Rahangadale, Gondia. Sarkarnama
विदर्भ

Gondia : शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा रस्ता गेला खड्ड्यात, 'या' आमदारांच्या मतदारसंघात विकास खुंटला?

Abhijit Ghormare_Guest

MLA Vijay Rahangadale News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघ हा शेतीवर अवलंबून आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची उपजीविका म्हणजे शेती. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ म्हणून तिरोडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा आहे. याच बाजार समितीमध्ये येण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना पक्के रस्ते हवेत. पण नेमक्या या महत्वाच्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.

जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तिरोडा-गोरेगाव. याच मतदारसंघात २०१४पासून भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांची एक हाती सत्ता आहे. तर तिरोडा शहर दुसऱ्या गोष्टीसाठी ओळखले ,जाते ते म्हणजे अदानी पावर प्रोजेक्ट. अदानींचा हा प्रकल्प येथून हाकेच्या अंतरावर आहे. आमदार विजय रहांगडाले यांनी मतदारसंघातील रस्त्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पाहायला मिळते.

वैनगंगा नदीवर असलेला धापेवाडा पूल भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना जोडतो. मात्र तिरोडा शहराला येणारा सहा किलोमीटर रस्ता संपूर्ण खड्ड्यात गेलेला आहे. तिरोडा तालुक्यामध्ये प्रवेश करण्याकरिता हा मुख्य मार्ग आहे. पण या रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली असल्याने या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाकरिता तिरोडा शहरात जातात. पण रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कमालीचा त्रास सहन करावा लागतो.

वाळू तस्करीही जोरात..

दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी येथील वाळू पांढरी शुभ्र आहे. या वाळूची मागणी नागपूरला मोठ्या प्रमाणात आहे. पण याच नदीवर असलेले वाळू घाट यांचे लिलाव झाले नसले तरी वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. वाळूने भरलेले ट्रक याच मार्गाने जात असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा महसुली अधिकारी याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येत आहे. विधानसभा क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून धापेवाडा उपसा सिंचन इथून खळबंदा जलाशय, चोरखमारा जलाशय व बोदलकसा जलाशयाला पाणी पोहोचवण्याकरता पाइपलाइनचे काम करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून बोदलकसा जलाशयाची पाईप लाइन रेंगाळत आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्र हा शेतकऱ्यांनी व्यापलेला असला तरी येथील मुख्य धंदा दुग्ध व्यवसायाचा आहे. शेतकऱ्यांची (Farmers) शेती बरोबर दूध व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र दुधावर अवलंबून असलेला कारखाना आमदार अद्यापही खेचून आणू शकले नाही. दुसरीकडे याच मतदार संघात काँगेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जोमाने कामाला लागली आहे. काँगेसने तर तिरोडा शहरातीलच जिल्हाध्यक्ष नेमला आहे. त्यामुळे आता जातीय समीकरणाची घडी नीट बसली तर येणारी विधानसभा आमदार महोदयांना जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT