Congress Party Workers on Agitation.
Congress Party Workers on Agitation. Sarkarnama
विदर्भ

Gondia District Politics : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हटवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ‘वज्रमूठ’!

मुनेश्‍वर कुकडे

Gondia District Congress Politics News : कॉंग्रेस आणि गटबाजी हे पक्के समीकरण झालेले आहे. नागपूर शहर आणि जिल्हा गटबाजीने पोखरून निघाला आहे. आता गोंदिया जिल्ह्यातही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट होत असताना गोंदियात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांना हटवण्यासाठी वज्रमूठ बांधली आहे. (Officials and activists have started a struggle)

जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि उपाध्यक्ष गप्पू गुप्ता यांना पदावरून हटविण्यासाठी अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघर्ष सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत तडजोड करू नये, अशा प्रदेश कॉंग्रेसच्या स्पष्ट सूचना असताना नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करत जिल्हाध्यक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा कॉंग्रेस बचाओ समितीने केली आहे.

शहीद भोला भवनात गुरुवारपासून (ता. १) बेमुदत साखळी उपोषणाला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचा विचार न करता गप्पू गुप्ता यांनी राजकुमार पटले यांना उपसभापतिपदावर विराजमान केले. यात उपसभापतिपदाच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक व सूचकसुद्धा चावी संघटनेतील निवडून आलेले संचालक आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, अरुण गजभिये हे कॉंग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकले. ते उपसभापतिपदाची निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. परंतु, परस्पर त्यांचा विरोध करण्यात आला. यात कॉंग्रेसची कोंडी करण्यात आली. गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही कॉंग्रेसला दूर सारण्यात आले.

सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारांना वेळेवर कोंडून नेले. कॉंग्रेसचे मलेश्याम येरोला, पी. सी. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शशी भगत आणि जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या सहकार्याने येथे भाजपसोबत हातमिळवणी झाली. त्यात कॉंग्रेसला सभापती आणि उपसभापतिपदापासून मुकावे लागले, असा आरोप उपोषणकर्त्या पदाधिकाऱ्यांचा आहे.

कोणत्याही प्रकारे भाजपसोबत तडजोड करू नये, अशा प्रदेश कॉंग्रेसच्या सूचना आहेत. तरीसुद्धा जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, उपाध्यक्ष गुप्ता यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस बचाओ समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. तसे निवेदन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे.

दीड हजारांवर पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत..

प्रदेश कॉंग्रेसने येत्या दहा दिवसांत जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अकराव्या दिवशी जिल्ह्यातील दीड हजारांवर पदाधिकारी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असेही उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेस काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अंतर्गत गटबाजी फोफावली..

जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वावर अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे याआधीही समोर आले आहे. ते एकाधिकारशाहीपणाने निर्णय घेत असल्याने अंतर्गत गटबाजी निर्माण झाली. ही गटबाजी अखेर समोर आली असून, एका गटाने आता थेट त्यांना पदावरून हटविण्याची मागणीच केली आहे. अन्यथा राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे.

साखळी उपोषणावर बसलेले पदाधिकारी..

कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) संचालक राजीव ठकरेले, अरुण गजभिये, शहराध्यक्ष जहीर अहमद, गोरेगाव तालुकाध्यक्ष पेमेंद्र रहांगडाले, गोंदिया तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती चमन बिसेन, कॉंग्रेस (Congress) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक मेंढे, गोंदिया (Gondia) महिला तालुकाध्यक्ष अनिता मुनिश्वर, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, गोरेगाव महिला तालुकाध्यक्ष भूमेश्वरी रहांगडाले, मंथन नंदेश्वर, रंजित गणवीर, रूपाली उके यांच्यासह अन्य पदाधिकारी साखळी उपोषणावर बसले आहेत

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT