Gram Panchayat Dhaba in Chandrapur Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Liquor : नवीन दुकानासाठी धाब्यात ग्रामसभा बोलाविली; प्रमुखांच्या अनुपस्थितीनं चर्चा रंगविली

संदीप रायपूरे

Topic Undecided : दारूचा मुद्दा गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविणे, कोविड लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात दारूची दुकानं उघडणे, दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण असे अनेक मुद्दे नेहमीच ‘हॉट टॉपिक’ बनलेय. अलीकडच्या काळात तर महाराष्ट्र सरकारनं बिअरची विक्री का घटतेय, याचा शोध घेण्यासाठी अभ्यासगटचे नेमलाय. त्यामुळं गावापासून राजधानीपर्यंत दारू हा विषय राजकीय ‘टेबल’वर कायम चर्चेत असतो. अशीच चर्चा रंगली चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गावात. मुद्दा पुन्हा तोच होता ‘दारू

गावात आधीच देशी दारूचं एक दुकान सुरू असताना दुसरं दुकान उघडण्यासाठी ग्रामपंचायतीकडं प्रस्ताव आला. साहजिकच ग्रामसभेत यावर चर्चा झाल्यानंतर परवानगी द्यायची की नाकारायची यावर निर्णय होणं अपेक्षित होतं. त्यामुळं मंगळवारी (ता. ७) ग्रामसभा बोलावण्यात आली. विषय तोच गावात नवी बाटली उभी करायची की आडवी? (Gramsabha in Dhaba Village of Chandrapur District Undecided on topic of Liquor Shop Permission by Gram Panchayat)

दारू आणि दारूबंदी हा पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील ज्वलंत विषय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये दारूबंदी होती. ती नंतर रद्द करण्यात आली. त्यामुळं धाब्यातील ग्रामस्थांसाठीही ही ग्रामसभा महत्त्वाची होती. ठरल्याप्रमाणं गावकरी सभेच्या नियोजित ठिकाणी एकत्र येण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थितांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यास सुरुवात केली. परंतु बराच वेळ झाला तरी सभेला सुरुवात होईना.

ग्रामस्थ प्रतीक्षा करून थकले. त्यांची चौकशी केल्यानंतर कळलं की गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारीच न आल्यानं सभा घ्यायची कशी हा पेच निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी आणखी काही काळ वाट पाहिली. त्यानंतर मात्र धाबा गावात चर्चेला सुरुवात झाली. स्वाक्षरी घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी रोखलं. कुणीही सभेला न आल्यानं ग्रामसभा ना तहकूब झाली ना पूर्ण. अशात नव्या बाटलीचा विषय अनिर्णितच राहिला. यासंदर्भात सरंपच नंदा घोगरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही. उपसरपंच हिरा कंदकुरीवार यांनी आपण बाहेर असल्यानं तूर्तास बोलता येणार नाही असं सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी रद्द करण्यात आली. त्यानंतर गावागावांत दारूची दुकानं उघडण्याचा सपाटाच सुरू झाला. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारू दुकानांची संख्या प्रचंड झाली. त्यासोबत ग्रामीण भागातील तक्रारीचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळं विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रशासनाला कोणताही निर्णय घेताना गांभीर्यपूर्वक विचार करून निर्णय घ्या, असे सक्त आदेश दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा ग्रामपंचायत सीमावर्ती भागात आहे. गावात एक देशी दारूचे दुकान आहे. दोन बार आहेत. त्यानंतरही गावात दारूचं नवीन दुकान सुरू करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव आलाय. त्यामुळं ‘देशी’ला गावात आणखी प्रवेश द्यायचा की नाकारायचा, असा प्रश्न ग्रामस्थांपुढं आहे. जो अद्यापही अनिर्णितच आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT