विदर्भ

हाताने बनविले एफडीआर, अन् ठेकेदार व बॅंक व्यवस्थापकाची मिलीभगत आली चव्हाट्यावर...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ठेकेदार असलेला व्यक्ती पदाधिकारी झाला की कसा भ्रष्टाचार करतो, याचे ताजे उदाहरण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत बघायला मिळाले. बॅंकेचा संचालक असलेल्या या ठेकेदाराने बॅंक व्यवस्थापकाच्या सोबतीने तब्बल १८ लाखांचे बनावट एफडीआर बनवून बॅंकेची आणि जिल्हा परिषदेची फसवणूक केली. पण हे एफडीआर हाताने बनवल्यामुळे ठेकेदार व व्यवस्थापक दोघेही फसले आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

यवतमाळ (Yavatmal) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Bank) शाखा पाटण (ता. झरीजामणी) येथे बँक संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार हे आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या (ZP) बांधकाम विभागातून एका कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी हा कारभार केला. त्यांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये होते. पण त्यांनी बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या सोबतीने तब्बल १८ लाख १० हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेव योजनेच्या पावत्या तयार केल्या. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्या पावत्या सादर केल्या. या पावत्या संगणकावर न करता हाताने तयार करण्यात आल्या आणि तेथेच शंका उपस्थित झाली अन् या प्रकाराचे बिंग फुटले.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यवतमाळची निविदा कंत्राटदार येल्टीवार यांनी निविदा क्र. २० व २१ नुसार निन्मत्तम निविदा भरली. एखाद्या कंत्राटदाराने निन्मत्तम निविदा भरल्यास त्या निविदेपोटी अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरणे गरजेचे आहे. कंत्राटदार येल्टीवार यांनी स्वतः जिल्हा बँकेचे संचालक असल्याचा गैरफायदा घेत अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या एकूण १६ बनावट पावत्या बनवल्या आणि त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सादर केल्या. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeevreddi Bodkurwar) यांनी हे बनावट एफडीआर प्रकरण प्रधान सचिवांच्या दरबारात पोहोचवले आहे. ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार संचालक मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ तसेच शाखा व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांनी शासनाची फसवणूक केली, असा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीतून आमदार बोदकुरवार यांनी केली आहे.

बॅंक प्रशासन गप्प का ?

बॅंकेचे संचालक या जबाबदार पदावर असलेल्या येल्टीवार यांनी जिल्हा परिषदेचीच नव्हे तर बॅंकेचीही फसवणूक केली. आमदार बोदकुरवार यांच्या तक्रारीवर काय कारवाई व्हायची ती होईलच. पण बॅंक प्रशासनाने या संचालकावर काय कारवाई केली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या बॅंकेला संचालकच फसवत असतील आणि प्रशासन व संचालक मंडळ मूग गिळून त्याला पाठीशी घालत असेल, तर संपूर्ण संचालक मंडळावर कारवाई का होऊ नये, असाही प्रश्‍न विचारला जात आहे.

डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न..

येल्टीवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे एकंदरीत घडामोडींवरून दिसतेय. त्यासाठीच झरीजामणी तालुका कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह राजीव येल्टीवार सक्रीय होते. या मेळाव्याला खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनाही बोलावण्यात आले. ‘खासदार आमच्या सोबत आहेत’, हेच दाखवण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत झालेल्या घोटाळ्यावर खासदार धानोरकर यांनी आवाज उठवला. चंद्रपूर जिल्हा बॅंकेत झालेल्या नोकरभरती घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी आजच त्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा बॅंकेत झालेला घोटाळा ते खपवून घेतील, असे वाटत नाही. अध्यक्ष टिकाराम कोंगरे हे स्वतः अन्य एका बॅंकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT