Agitation on Chagan Bhujbal's statement.
Agitation on Chagan Bhujbal's statement. Sarkarnama
विदर्भ

भुजबळांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक; राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन

Atul Mehere

नागपूर : शाळांमध्ये सरस्वती मातेचे छायाचित्र लावण्यावरून माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर सरस्वती मातेचे पूजन करून भुजबळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निधेध केला.

छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवे वादंग निर्माण झाले आहे. भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून (Police) खबरदारी देखील घेतली जात आहे. अशात भारतीय जनता युवा मोर्चाने (BJYM) शहरातील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यालयासमोर सरस्वती पूजन करीत निषेध केला.

शाळेत सरस्वती मातेचे छायाचित्र लावण्यावरून केलेल्या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे पडसाद नागपुरात उमटले. भारतीय युवा मोर्चाने नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन करीत आरती केली व प्रसादाचे वाटप केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ, शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावले.

काय म्हणाले होते भुजबळ?

शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी उपस्थित केला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या शाळांतील सरस्वतीचे छायाचित्र कदापि काढले जाणार नाहीत, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सरस्वती ही विद्येची आणि कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. भारतीय संस्कृती, हिंदुत्व मान्य नसलेली व्यक्तीच असे बोलू शकते, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर नागपुरात सरस्वती पूजन करण्यात आले.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी भुजबळ यांनी केला होता.

अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले. त्यांची पूजा कशासाठी करायची, असा प्रश्न भुजबळ यांनी केला. अधिक बोललो असेल तर माफ करा, असे सांगत या महापुरुषांची आणि त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT