Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

ज्याने मागच्या जन्मी पाप केलं, तो साखर कारखाना सुरू करतो…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : हे जे ‘तेल नावाचं वर्तमान’ आहे, याने माझ्या आयुष्याचही बरंच तेल केलं आहे. कारण मी या विषयावर गेले १५-२० वर्ष जगलो आहे. ज्याने मागच्या जन्मी पाप केलं असेल, तो दोन गोष्टी नक्की करतो. एक तर वर्तमानपत्र सुरू करतो नाहीतर साखर कारखाना सुरू करतो. मी साखर कारखाना सुरू केला आणि माझ्या आयुष्याचं चागलंच तेल निघालं, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

काल सायंकाळी नागपुरातील (Nagpur) वनामती सभागृहात शहरातील प्रख्यात डॉक्टर पिनाक दंदे यांच्या डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर, डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते. निवृत्त संपादक बाळ कुळकर्णी या कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी गडकरी म्हणाले, सध्या मी विदर्भात तीन साखर कारखाने चालवत आहो. साखर कारखान्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे मेरीटमधील विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा म्हणजे प्रथम श्रेणीत पास झालेल्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे १०० पैकी २० पेक्षाही कमी गुण मिळणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांची शाळा आहे. या शाळेत मी गेली १५ ते २० वर्ष घालवली आणि माझं चांगलंच तेल निघालं. पण आता मी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आलो आहे. कारण कुठल्याही विषयात हार मानायची नाही, हे ठरवून मी काम करतो. त्याचे फळ मला मिळाले. सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकरी १०७ टन ऊसाचे उत्पादन घेतले आणि माझ्या कारख्यान्यांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे.

शेतकरी देतील पेट्रोल, डिझेलला पर्याय..

पाण्यातून हायड्रोजन काढून त्यावर वाहने चालविण्यात येतील. हे भविष्यातील इंधन आहे. पुढील दहा वर्षात शेतकरी पेट्रोल, डिझेलचा पर्याय देतील, असे सांगताना गडकरी म्हणाले, नागपुरात इलेक्ट्रिक बस सुरू केल्या होत्या. पण महानगरपालिकेने तिकिटाचेही पैसे कंपनीला दिले नाही. अखेर कंपनी कंटाळून बस घेऊन निघून गेली. कंपनीने महापालिकेवर दावाही केला. ऑर्बिट्रेटर नेमून हा वाद आता निकाली निघाला आहे. येणारा काळ हा इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन व इलेक्ट्रिकवरील इंधनाचा आहे.

महानगरपालिकेवर ओढले ताशेरे..

पुढील दोन वर्षात प्रत्येकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसून येईल. येत्या १६ मार्चला ग्रीन हायड्रोजनवरील वाहनाचे लोकार्पण करणार आहे. महापालिका, नगरपालिकांना शौचालयाच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून इलेक्ट्रोलायजरचा वापर करीत ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेला इथेनॉलवरील स्कॅनिया कंपनीच्या बस दिल्या. परंतु महापालिकेने त्यांना इथेनॉलचेही पैसे दिले नाही. पैस न दिल्याने ही कंपनी बस घेऊन निघून गेल्याचे नमूद करीत यांनी मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT