MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar
MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Sarkarnama
विदर्भ

जे ब्रम्हदेवालाही माहिती नाही, ते संजय राऊतांना कसे माहिती पडले ?

सरकारनामा ब्युरो

नागपूर : राज्यसभेच्या (Rajyasabha) निवडणुकीच्या निकालानंतर अपक्षांनी आमच्यासोबत दगाफटका केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर संजय राऊत आमच्यावर चुकीचे आरोप करत आहेत, संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? मी नेत्यांना सांगून उघडपणे मतदान केलं. संजय राऊत यांनी असे जर आमच्यावर आरोप केले तर येत्या निवडणुकीमध्ये आम्हा अपक्षांना वेगळा विचार करावा लागेल, असे अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

ब्रम्हदेवालाही ज्या गोष्टी माहिती नाही, त्या संजय राऊतांना (MP Sanjay Raut) कशा काय माहिती झाल्या? अपक्षांचं मतदान हे गुप्त असते. मी उघड उघड मतदान केलं. जातानासुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सांगून मतदान केलं. मत टाकून परत आल्यानंतरही त्यांना सांगितलं की, मी अशा पद्धतीने मतदान केलं आहे. गुप्त मतदान पद्धती असतानासुद्धा मी उघडपणे सांगत गेलो आणि मिडीयासमोर येऊनसुद्धा सांगितलं की, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान केल आहे. तरीही खासदार संजय राऊत जे आरोप करीत आहेत, हे सर्व अनाकलनीय आहे, असे आमदार भुयार (MLA Devendra Bhuyar) म्हणाले.

पहिल्या क्रमांकावर संजय पवार, दुसऱ्या क्रमांकावर संजय राऊत आणि तिसऱ्या पसंतीचे मत मी प्रफुल्ल पटेल यांना दिले. हेसुद्धा मी जाहिरपणे बोललो होतो. पण आज संजय राऊत यांनी फुटलेल्या आमदारांमध्ये माझं नाव घेतलं, ते पूर्णतः चुकीचं आहे. त्यांचं वागणं असंच जर राहिलं, तर आम्ही येत्या निवडणुकीत आम्ही त्यांना सांगून त्यांच्या विरोधात मतदान करू नाहीतर तटस्थ राहू. यासंदर्भात मी शरद पवारांनाही कॉल केला आणि लेखी स्वरुपातही पवार यांच्याकडे तक्रार करणार आहो, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

राज्यातल्या तीन प्रमुख पक्षांना एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी कुणाबद्दलही बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे. कारण पहिल्या दिवसापासूनच मी महाविकास आघाडीसोबत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. संजय राऊत विधानसभेच्या वेळी आले, पण त्याच्याही आधीपासून मी आहे. भाव वधारण्याचे कुठलेही कारण नाही. महाविकास आघाडीला सोडण्याचेही कारण नाही. त्यामुळे मी सदैव महाविकास आघाडीसोबतच आहे, असे आमदार भुयार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT