SC People for Water Sarkarnama
विदर्भ

पाणी मिळत नाही म्हणून, काल रात्रीपासून शेकडो लोक बसले गावाच्या वेशीवर…

अनुसूचित जातीच्या (SC) लोकांना पिण्याचे पाणी (Water) मिळत नाही. त्यामुळे काल रात्रीपासून शेकडो लोकांनी गावाच्या वेशीवर बसून आंदोलन पुकारले आहे.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : जग आज कुठल्या कुठे निघून गेले. पण महाराष्ट्राच्या (Maharashtra) ग्रामीण भागात जात-पात, छुत-अछुत, भेदभावाच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे (Chandru Railway) तालुक्यातील सावंगी मगरापूर गावात घडली आहे. येथे वार्ड क्रमांक १ मधील अनुसूचित जातीच्या लोकांना पिण्याचे पाणी (Water) मिळत नाही. त्यामुळे काल रात्रीपासून शेकडो लोकांनी गावाच्या वेशीवर बसून आंदोलन पुकारले आहे.

पाण्यासाठी तरसलेल्या या लोकांच्या सहनशीलतेचा काल अंत झाला आणि एक-एक करत रात्री कडाक्याच्या थंडीत सर्वजण घरांबाहेर पडले. गावाच्या वेशीवर त्यांनी ठिय्या दिला आहे. आता जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे. पिण्याचे पाणी मिळावे म्हणून या लोकांनी आतापर्यंत खूप पायपीट केली. पण त्यांना कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यापुढे हा अन्याय सहन करणार नाही. आमचे पाणी रोखणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

गेल्या २८ दिवसांपासून अनुसूचित जातीचे लोक राहात असलेल्या वार्ड क्रमांक १ मध्ये पाण्याचा पुरवठा जाणीवपूर्वक करण्यात आला नाही. यासाठी उपसरपंच जबाबदार असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. उपसरपंचांनी मुद्दामहून आमचे पाणी रोखले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी आणि आमच्या वस्तीला तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा, असा पवित्रा या लोकांनी घेतला आहे. तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार या सर्वांकडे आम्ही मागणी केली, पण त्याची दखल घेतली गेली नाही, असेही सांगण्यात आले आहे.

गेले २०-२५ दिवस त्या वार्डातील लोकांना पाणी मिळाले नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी पाईप फोडले, म्हणून पाणी मिळाले नाही. त्यामागे कुणाचाही आकस वगैरे काही नाही. गावातील पाइपलाइन फुटली होती. ग्रामपंचायतीने दुसरी पाइपलाइन टाकली. त्यामध्ये त्यांनी काय तोडफोड केली, माहिती नाही. पण त्या वार्डात पाणी पोहोचले नाही. पण ही बाब तेथील लोकांनी आम्हाला सांगितली नाही. तेव्हाच आम्हाला सांगितले असेल, तर आम्ही तत्काळ व्यवस्था केली असती आणि त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असे सावंगीच्या सरपंच म्हणाल्या. तर आम्ही गरजू लोकांना नळ देण्यासाठी ठराव घेतला. सर्वांना नळ दिले, जास्त नळ आम्ही वार्ड क्रमांक एकमध्ये दिले, त्यामुळे भेदभाव केला, असे म्हणता येणार नाही. आता आम्ही नळ सुरू करणार आहोत, असे उपसरपंच म्हणाले.

विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून पाणी दिलं जात नसेल तर नक्कीच मोठी कारवाई केली जाईल. पण, यापूर्वी याच भागातून एक घटना समोर आली होती. त्यानंतर चौकशी केली असता स्थानिक राजकारणामुळे ते घडल्याचं समोर आलं होतं. पण, या घटनेची चौकशी आम्ही करू. पण, अशी पावले उचलण्यापेक्षा आम्हाला सांगावं, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

अनुसूचित जातीच्या लोकांना पाणी का नाकारले गेले, कुणी केले हे जरी पुढे आले नसले तरी लोकांची हिंमत होतेच कशी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि आमदारांना सांगितल्यानंतरही कारवाई का केली गेली नाही, गावगड्याच्या हीन राजकारणामुळे संबंधित यंत्रणेने याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय आणि मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष गावाच्या वेशीवर थंडीत कुडकुडत बसतात, त्याचे प्रशासनाला काहीच कसे वाटत नाही, असे प्रश्‍न या घटनेने उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT