MP Prafull Patel
MP Prafull Patel Sarkarnama
विदर्भ

माझ्यावर प्रेम करणाऱ्या ‘त्या’ आमदाराने मला एक मत दिले..!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आले की, काही अपक्ष मत भाजपला गेली आहेत, एक मत अपात्र ठरलं. तर आमचे दोन नेते तुरुंगात आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम निकालावर झाला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा फटका नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आज नागपुरातील विमानतळावर (Nagpur Airport) माध्यमांशी बोलताना पटेल (Prafull Patel) म्हणाले, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांची मतं फुटली नाहीत. आमच्या अधिकृत उमेदवारांना दिलेल्या निश्चित कोट्याप्रमाणेच मतं दिली आहेत. सरकारमध्ये असलेले आणि पाठिंबा देणारे लहान पक्षही महाविकास आघाडीसोबत राहिले. मला स्वतःला 51 मतं घेता आले असते. मात्र आम्ही 42 चा कोटा ठरवला आणि मला 42 मत मिळाल्यानंतर उरलेले राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांचे 9 मतं संजय पवार यांना दिले.

माझ्यावर प्रेम करणारे अनेक..

मलाच माहीत नाही की मला अतिरिक्त मत कोणाचे मिळाले. माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती कोण आहे, हे माहीत नाही. असे माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. मी जर त्यांना संपर्क साधला असता. तर 4 ते 5 मतं फक्त प्रेमापोटीच जास्त मिळवले असते. आम्ही मतं खरेदी विक्रीच्या भानगडीत पडलो नाही. सर्वांशी संपर्क साधला. अपक्ष आणि लहान पक्षांचे आमदार आमच्या सोबत होते. पण त्यांच्यापैकी कुणीतरी फुटले आहे. त्याचा शोध घेतला जाईल, असे पटेल यांनी सांगितले.

‘ती’ 44 मतं, हा संशोधनाचा विषय..

आता काँग्रेसने 44 मते घेतले. हा संशोधनाचा विषय आहे. मला माहीत नाही की, त्यांनी पक्षांतर्गत कितीचा कोटा ठरवला होता. मात्र महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे 42 चा कोटा ठरवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी अधिकृतपणे सांगू शकतो की, आम्ही आमचे 51 मत व्यवस्थित वापरले आहे. कुठेही एक मताचेही नुकसान झालेले नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बोलू शकतो काँग्रेसबद्दल नाही. एक दोन दिवसात आम्ही माहिती घेऊ. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही पटेल म्हणाले.

हा काही मोठा प्रलय नाही..

भाजपचा विजय म्हणजे काही खूप मोठा प्रलय आला आहे, आमचे सर्व सहकारी आम्हाला सोडून गेले आहे, अशी स्थिती नाही. आम्ही याचे विश्लेषण नक्कीच करू आणि याच्या खोलात जाऊ. विधान परिषदेची मतदान प्रक्रिया वेगळी आहे. तिथे गुप्तरीत्या मतदान टाकलं जातं. राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी गडबड केली तर कारवाईही होऊ शकते म्हणून एक दोन दिवसात चर्चा करू. कामाबद्दल काही आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तीन पक्षांचे सरकार आहे. छोटे पक्ष आणि अपक्षही त्यामध्ये आहेत. त्यामुळे असे विषय हाताळण्यासाठी थोडा अवधी लागतोच, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT