Wardha & Akola Collector Sarkarnama
विदर्भ

IAS News : वर्धा आणि अकोल्याच्या कलेक्टरची सरकार पाठ थोपटणार; कारण माहिती आहे का?

प्रसन्न जकाते

Akola News : वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीसाठी सरकारकडून शाबासकीची थाप मिळणार आहे. निवडणूक विषयक महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे.

नागपूर विभागातून कर्डीले पती-पत्नी यांची तर अमरावती विभागातून कुंभार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सर्वोकृष्ट मतदार नोंदणी केल्याबद्दल राज्यभरातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यात विदर्भातील या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पुणे विभागातून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नाशिक विभागात नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, छत्रपती संभाजीनगर विभागात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे, कोकण विभागात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 2023 मध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवित मतदार नोंदणीचा टक्क वाढविला होता. नेहमीप्रमाणे शासकीय आवाहन, शिबिरांचे आयोजन अशा चौकटीबाहेर जात या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन मतदारांना नोंदणीसाठी आकर्षित केले.

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे. यात अमरावती विभागातून अनिता भालेराव यांचा समावेश आहे. नागपूर विभागातून राहुल कर्डीले यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले यांनी देवळी मतदार संघासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे विभागातून साताऱ्योच अतुल नेत्रे, कोकण विभागातून ठाण्याचे अमित सानप, नाशिक विभागातून विशाल नरवडे, छत्रपती संभाजी नगर विभागातून लातुरचे सुशांत शिंदे यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्डीले हे वर्धा येथे जिल्हाधिकारीपदावर रूजू होण्यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार हे यापूर्वी बृहन्मुंबई महापालिकेत सहआयुक्त होते. मुंबई महापालिकेत त्यांची कारकीर्द सकारात्मक व दखलपात्र ठरली होती. अकोल्यात नियुक्त झाल्यानंतर त्यांनी शासकीय कार्यालयात राबविलेली स्वच्छता मोहिम चर्चेत आली. सामान्यांसाठी केबिनचे दार खुले ठेवणारा अधिकारी म्हणून कुंभार यांनी अकोल्यात ओळख आहे. भेटायला येणाऱ्यांकडून कुंभार हे पुष्पगुच्छ स्वीकारत नाहीत. त्याऐवजी त्यांना पुस्तक भेट स्वरूपात स्वीकारायला आवडते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे ते महसूल विभागात चर्चेत असतात.

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि अकोल्याचे अजित कुंभार यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवनवे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्डीले व कुंभार कमी वेळात नागरिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT