Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray : पैसेच मागणार असाल तर उद्योग येतील कसे, राज ठाकरेंचा सवाल !

Atul Mehere

चंद्रपूर : कोट्यवधींची गुंतवणूक व लाखो तरुणांना रोजगार देणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेला कसा? चर्चा कुठे फिस्कटली आणि कोणी पैसे मागितले? याची चौकशी करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरताना राज्यातील शिंदेसेना-भाजप सरकारचे महाराष्ट्राकडे लक्ष नाही, अशी जोरदार टीका केली.

विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर असलेले राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विद्यमान सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘तुम्ही पैसेच मागणार असाल तर राज्यात उद्योग कसे उभारले जातील’ असाही सवाल त्यांनी केला. कुठल्याही उद्योजकाची पहिली पसंती महाराष्ट्र असते. त्यामुळे आमचे नेते बिनधास्त झाले आहेत. कोणी काही करायला तयार नाही. गुजरात चांगली ऑफर देणार असेल तर उद्योग तिकडे जाणारच, असे सांगून ठाकरे यांनी शिंदे सरकारलाही टोला हाणला.

दलबदलूना धडा शिकवा..

युती एकाशी, आघाडी दुसऱ्याशी करणाऱ्या राजकीय पक्षांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. ही मतदारांची प्रतारणा असल्याचे सांगताना ठाकरे यांनी पहाटे शपथ घेणारे फडणवीस आणि युतीत लढून आघाडीसोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे आधीच ठरले होते तर मोदी-शहा यांच्या प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरे जाहीरपणे का बोलले नाहीत? असाही सवाल ठाकरेंनी केला.

विदर्भाबाबत जनमत घ्या..

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांनी याबाबत जनमत चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही चाचणी ब्रेक्झिटप्रमाणे घ्यावी, असाही सल्ला त्यांनी दिला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ओला दुष्काळ यावर प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले.

फुकटात देणाऱ्यांचा विरोध..

मोफत वीज, पाणी देण्याच्या घोषणांमुळे राज्याचेच नव्हे देशाचेही आर्थिक नुकसान होते. कोणी तुम्हाला काही फुकट मागत नाही. अमुक अमुक फुकटात द्या, अशा मागणीचा एकही मोर्चा आजपर्यंत निघाला नाही. फक्त त्यांना योग्य दरात सुविधा उपलब्ध हव्या आहेत. मोफत घोषणांना आपला विरोध असल्याचे राज म्हणाले.

लॉकडाऊनची बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच विदर्भात आलो. विरोधी पक्ष आणि पत्रकार सोडता सर्वच त्या काळात गप्प होते. त्यामुळे मी सुद्धा गप्पच होतो. सर्वजण म्हणायचे की गेले दोन वर्ष तुम्ही गप्प का होते. सर्व बंधन उठल्यावर गुढीपाडव्याचा मेळावा झाला आणि त्यानंतर काही विषयांना हात घालयला सुरुवात झाली, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT