Maratha Protest in Akola Sarkarnama
विदर्भ

Maratha Protest in Akola : जरांगेंनंतर गजानन यांनीही घेतलं उपोषण मागं, गावागावांत जाऊन आता मराठ्यांना करणार जागं

जयेश विनायकराव गावंडे

Support to Manoj Jarange Patil in Akola : मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अकोला येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या गजानन हरणे यांनीही आपलं उपोषण मागं घेतलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास अकोल्यात पुन्हा तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अन्नत्याग आंदोलन मागं घेतलं असलं तरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती अभियान २ जानेवारीपर्यंत राबविण्याचा मानस हरणे यांनी व्यक्त केला.

मराठा आंदोलनाचा लढा बुलंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं हरणे यांनी सहा दिवसांपूर्वी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी प्रतिसाद दिला. दररोज वेगवेगळे समाजघटक आंदोलनस्थळी येऊन लाक्षणिक उपोषण करीत होते. गोंधळ, मुंडन, भजन असे अनेक कार्यक्रमही सत्याग्रह मंडपात झालेत. जवळपास दीडशेवर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. (In support of Manoj Jarange Patil the ongoing food boycott movement in Akola over the Maratha reservation issue has finally come to an end)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी अशी सर्व समाजबांधवांची अपेक्षा होती. आता मनोज जरांगे व गजानन हरणे दोघांनीही अन्नत्याग आंदोलन मागं घेतलं असलं तरी सरकारने मराठा समाजाला शक्य तितक्या लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा तीव्र लढा उभारला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार, डॉ. अभय पाटील, डॉ. अमोल रावनकर आदींच्या उपस्थितीत गजानन हरणे यांनी फळांचा रस घेत आपलं उपोषण मागे घेतलं. अकोला जिल्ह्यातील चरणगावात मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता ही गावबंदी मागं घेण्यात आल्याचं सांगण्यात येते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या घरांना घेरावही घातला होता. जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्यानं आता नेत्यांना जिल्ह्यात व गावांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं मध्यंतरीच्या काळात नेत्यांचे थांबलेल्या ग्रामीण भागातील दौरे पुन्हा सुरू झाले आहेत. शासन आरक्षणाबाबत कोणता तोडगा काढतं, याबाबत सध्या जिल्ह्यातील मराठा समाजानंही ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT