नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते, गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा म्हणजे वरून कीर्तन अन् खालून लावणी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते’, असे म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर (Nagpur Airport) मंत्री मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं ते वक्तव्य अमित शहांसाठी लागू होत नाही, खरं तर ते वाक्य तंतोतंत उद्धवजींसाठी (Uddhav Thackeray) लागू होतं. वरून कीर्तन म्हणजे स्वातंत्रवीर सावरकरांचे प्रेम आणि खालून लावणी म्हणजे, खुर्चीचा अन् सत्तेसाठी त्यांनी चालविलेला तमाशा. हे त्यांचं त्यांना स्वतःला वाटतं. पण हे करताना ते एक गोष्ट विसरले की, दुसऱ्यांकडे एक बोट दाखवलं तर उरलेली बोटं आपल्या स्वतःकडेच असतात. त्यामुळे त्यांनी बोललेले ते वाक्य त्यांनाच लागू होतं.
घटनापिठाच्या पुढे ढकललेल्या सुनावणीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, त्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर त्याचा निर्णय लागेल. प्रकरण न्यायालयाच्या घटनापिठापुढे असल्याने त्याबाबत आता बोलणे उचित होणार नाही. दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये तुफान रस्सीखेच सुरू आहे. मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार, यावरून दररोज क्रिया-प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात मंत्री मुनगंटीवार म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी मैदानाबाबत कुणी काय मागणी केली, हे मला माहिती नाही. दसरा मेळाव्सायाठी मैदान ब्लॉक करावे अशा सूचना BMC ने केल्या की नाही, याचीही माहिती नाही, त्यामुळे त्यावर बोलणार नाही.
विजयादशमी म्हणजे सत्याने असत्यावर मिळविलेला विजय. दसरा हा आनंद वाटण्याचा दिवस आहे. या दिवशी लोकांनी एकमेकांना भेटून आपले प्रश्न चर्चेतून सोडविले पाहिजे. या दिवशी वाद न करता सामंजस्याने वागले पाहिजे. एका मैदानासाठी जर वाद सुरू असेल तर ते मैदान यांनाही नाही आणि त्यांनाही नाही, असा निर्णय झाला पाहिजे, तरच चांगले होईल. अर्थात याबाबतचा निर्णय मुंबई महापालिका घेईल. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत. यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गणेशोत्सवानिमित्त घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार दोन्ही नेते राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे आता मनसे-भाजप युती होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण या भेटीकडे युती या दृष्टीने न बघता. महाराष्ट्राची राजकीय परंपरा, दृष्टीने बघणे गरजेचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.