Chirta Wagh
Chirta Wagh Sarkarnama
विदर्भ

Chirra Wagh : निवडक महिलांचा तो अवमान व उर्वरित महिलांचे काय ?

Atul Mehere

अकोला : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य किंवा संभाजी भिडे गुरूजी यांचे महिलांबाबतच्या विचारांचे समर्थन करता येणार नाही. मात्र, निवडक महिलांचा तो अवमान व उर्वरित महिलांचे काय, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कंगणा राणावत, स्वप्ना पाटकर या महिलांना अर्वाच्य भाषेत संजय राऊत बोलत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता, असा शब्दांत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टिका केली.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज अकोला (Akola) येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात सिंदखेड राजा येथून माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून केली. त्यांनी विदर्भ दौरा करण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना राज्यात (Maharashtra) सत्तांतर झाल्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगितले. अडीच वर्षातील ऑनलाइन सरकार गेले. आता मिळून मिसळून काम करणारे सरकार आले आहे. १०० दिवसांतील कामगिरीतून ते दिसून आले आहे. महिला सक्षमीकरण हे कागदावर न राहता प्रत्यक्ष दिसू लागेल. महिलांना न्याय देण्याचे काम शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार करीत आहे. कुपोषणाचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा, हे सरकार किती तत्परतेने निर्णय घेते, याबाबत त्यांची काही उदाहरणे दिली.

बुलढाणा जिल्‍ह्यातील टीबी रुग्णालयात रुग्णांसाठी पोषण आहार सुरू करण्यात येणार आहे. मुलींसाठी बालसुधारगृह बुलढाण्यात सुरू केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेला हे सरकार प्राधान्य देत आहे. नंदुरबार येथील आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरणात दोन पोलिसांना निलंबित केले. पुण्यातील महिला व्यावसायिकावर हात उचलणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावरील कारवाई, मंत्रालयातील अवर सचिव महिलेचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेवून सरकारने हे सिद्ध केले असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्यात. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश महासचिव आमदार रणधीर सावरकर, अकोला महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने, ओबीसी जिल्हाध्यक्ष जयंत मसने, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती.

हिंगणघाटच्या निर्भयाला न्याय देणार..

हिंगणघाट येथील निर्भयाला महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. तिच्या कुटुंबांना दिलेले एकही आश्वासन अडीच वर्षाच्या सरकारने पाळले नाही. आता या निर्भयाला व तिच्या कुटुंबीयांना शिंदे-फडणवीस सरकार नक्की न्याय मिळवून देईल, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

याकडेही वेधले लक्ष..

पूजा चव्हाण प्रकरणात न्याय नक्की मिळेल, तोपर्यंत चित्रा वाघ यांचा लढा सुरूच राहील.

संजय राठोड यांना क्लिन चिट महाविकास आघाडी सरकारकडूनच.

महागाईची झळ सर्वांनाच, कठीण काळात कठोर निर्णय घेतले, आता लवकरच सर्व सुरळीत होईल.

कुपोषण होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न सरकारकडून सुरू.

विरोधकांकडून वेगळे मुद्दे उपस्थित करून सरकारच्या चांगल्या कामगिरीवरून लोकांचे लक्ष निरर्थक गोष्टीकडे वळविण्याचा प्रयत्न.

लोकसभेत भाजपचे ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य, यात महिला मोर्चाचा वाटा असेल.

विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा भाजपला मिळवून देण्याचे लक्ष्‍य.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT