IPS Sandip Patil. Sarkarnama
विदर्भ

IPS Transfer : कर्तबगारीचे बक्षीस!! संदीप पाटील नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’

Atul Mehere

Gadchiroli : आयपीएस संदीप पाटील हे नाव परिचित नाही, असा कदाचितच एखादा सापडेल. ‘लाइमलाइट’मध्ये न राहता आपले कर्तव्य चोखपणे बजावणारे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप पाटील यांना त्यांच्या कर्तबगारीचे बक्षीस मिळाले आहे. एकेकाळी गडचिरोलीमध्ये शेकडो नक्षल एन्काऊंटर करणारे पाटील आता नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’ झाले आहेत.

गडचिरोली पोलिस अधीक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांची पुणे येथे बदली झाली होती. कोविड काळात पाटील यांनी पुण्यात केलेल्या कामाची स्तुती राज्यभर झाली. पुण्यातून त्यांची पदोन्नतीवर उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून गडचिरोली परिक्षेत्रात बदली झाली. पुण्यासारख्या शहरातून पुन्हा विदर्भात मिळालेली ‘पोस्टिंग’ पाटील यांनी स्वीकारत नक्षलवादी चळवळीचा बिमोड केला.

आयपीएस संदीप पाटील डीआयजी असतानाच मर्दीनटोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवादी चळवळीचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला. याच चकमकीत तब्बल 26 नक्षवादी ठार झाले होते. महाराष्ट्रापासून केंद्रापर्यंत सर्वांनीच या कामगिरीचे कौतुक केले. जणू एखाद्या क्षेत्रात एखादा व्यक्ती पूर्णत: ‘मास्टरी’ मिळवितो अगदी त्याच पद्धतीने संदीप पाटील यांनी नक्षलवाद विरोधी मोहिमेवर आपली ‘कमांड’ मिळविली आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना याच विभागाच्या डीआयजी पदावरून आयजी अशी पदोन्नती देण्यात आली असावी असे सांगण्यात येत आहे.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक असताना पाटील यांनी या नक्षलवाद प्रभावित जिल्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. सीमावर्ती भागात चालणाऱ्या कारवायांवर त्यांनी अंकुश लावला. त्यांचा हाच अनुभव ते डीआयजी झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या कामी आला. अनेक चकमकींमध्ये गडचिरोली पोलिसांना जे यश आले, त्यामागे संदीप पाटील हे नाव घेतलेच जाते. गडचिरोली पोलिसांसोबतच पाटील यांचे स्वतंत्र असे ‘इन्फर्मेशन नेटवर्क’ आजही कार्यरत असल्याचे सांगितले जाते. आपल्या या अनुभवाचा फायदा ते महाराष्ट्र पोलिस दलाला करून देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोलीचे डीआयजी असताना पाटील यांचे कार्यालय नागपुरात होते. पदोन्नतीनंतर ते नागपुरातल्या नागपुरात एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बसणार आहेत. हे कार्यालय बदलताना त्यांच्या कामाचे स्वरूप मात्र आता व्यापक होणार आहे. गडचिरोलीसह आता राज्यभरातील नक्षलवादी पाळेमुळे उखडून फेकण्याची महत्त्वाची जबाबदारी पाटील यांच्यावर असेल. विशेषत: छुपा शहरी नक्षलवाद हुडकून काढण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नक्षल विरोधी अभियानाच्या आयजी पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर होती. आता पाटील ही जबाबदारी लिलया पेलतील यात शंकाच नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT