Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama
विदर्भ

Walse Patil : वरिष्ठांनी अजित दादांबद्दलचा ‘तो’ निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, माहिती नाही!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : प्रभारी म्हणून नागपूरच्या (Nagpur) कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्या निमित्ताने कुठपर्यंत तयारी आली आहे, या संदर्भात कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आज नागपुरात दोन मेळावे आयोजित केले होते, त्यांपैकी एक सकाळी झाला आणि एक मेळावा आता सायंकाळी होणार आहे, असे दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) म्हणाले.

रवी भवनमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. खरं तर मला महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) गृहमंत्री व्हायचं होतं, पण वरिष्ठांच्या आदेशानुसार मला अर्थमंत्रालय सांभाळावं लागलं, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतच केलं, याबाबत विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, वरिष्ठांनी तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, हे मला सांगता येणार नाही आणि त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे सांगत त्यांनी अजित दादांच्या विषयावर बोलण्याचे टाळले.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी आमची सुरू आहे. शक्य झालं तर महाविकास आघाडी मिळून आम्ही ही निवडणूक लढू. नाहीतर एकट्याच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढू कारण पुढे आम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात चांगले यश मिळेल. कारण राष्ट्रवादीने विदर्भातून ११ आमदार निवडून दिले होते. आता पुन्हा एकदा आम्ही नव्याने तयारी करतो आहे. त्यामुळे विदर्भात आणि विशेषकरून नागपूर शहर आणि जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्‍वास वळसे पाटलांनी व्यक्त केला.

राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी परिस्थिती आहे. स्थानिक पातळीवर आम्ही कॉंग्रेसच्या नेत्यांशी बोललेलो आहोत आणि ही बोलणी सुरू आहे. जर आघाडी झाली तर आघाडीत लढू नाहीतर स्वतंत्र लढू. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल का, असे विचारले असता, दुसऱ्यांच्या भांडणाचा फायदा घेतल्यापेक्षा आम्ही जनतेच्या समोर जाऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज नागपूर शहरामध्ये २०१२ साली भाजपने घोषणा केली होती की, पिण्याचे पाणी आम्ही २४ बाय ७ देऊ. पण आज नागपूर शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे.

येथे आधीच प्रचंड बेरोजगारी आहे. त्यातही शेजारच्या राज्यातून लोकांचे लोंढेच्या लोंढे नागपुरात दाखल होत आहेत. परिस्थिती गंभीर झाली आहे. ही परिस्थिती आम्ही जनतेसमोर मांडू, असे वळसे पाटलांनी सांगितले. एनआयएच्या धाडीबद्दल विचारले असता, या धाडी कालपासून देशभर सुरू आहेत. पीएफएवर जी कारवाई होते आहे त्याची माहिती निश्‍चितपणे केंद्र सरकारकडे असणार, त्या आधारावर त्यांनी या धाडी टाकल्या. या फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभर टाकण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT