Eknath Shinde and MP Krupal Tumane Sarkarnama
विदर्भ

तेव्हाच वाटले होते की तुमाने शिंदे गटात जातील, आज अधिकृत प्रवेश?

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह सुमारे १२ ते १४ खासदार आज शिवसेनेला (Shivsena) अधिकृत जय महाराष्ट्र (Maharashtra) करणार आहेत. या संदर्भात काल रात्री सर्व खासदारांची दिल्लीत बैठक झाली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन हे खासदार निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सातत्याने खासदार तुमाने यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काही खासदारांची बैठकही झाली होती. मात्र या वृत्तास तुमाने (Krupal Tumane) यांनी नकार दिला होता. एवढेच नव्हे तर ‘खोडसाळपणाचे वृत्त का देता’ म्हणत पत्रकारांनाही झापले होते. कळमनुरीचे आमदार संजय बांगर (MLA Sanjay Bangar) यांनीही सुरुवातीला ‘मी एकनिष्ठच’ म्हणत लगेचच एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले होते.

मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तुमाने उशिरा पोहोचले होते. मात्र, तोपर्यंत ते अनुपस्थित असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. शुक्रवार आणि शनिवारी शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत दोन दिवस नागपूरमध्ये मुक्कामी होते. दोन्ही दिवस तुमाने त्यांना भेटायला गेले नाहीत. तेव्हापासून तुमाने शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. नागपूरच्या संपर्क प्रमुखांनी बैठकीची माहिती दिली नाही, असे तुमाने यांच्या समर्थकांचे म्हणणे होते.

मात्र, आज १२ खासदार शिवसेना सोडणार या वृत्तास तुमाने यांनी नकार दिला नाही. ‘उद्या आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. तोपर्यंत प्रतीक्षा करा’ असे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना सोडण्याचा निर्णयाप्रत ते आले असल्याचा राजकीय कयास लावला जात आहे.

का सोडणार शिवसेना?

रामटेक लोकसभा मतदारसंघातून तुमाने दोनदा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना-भाजप युतीचा त्यांना चांगलाच फायदा झाला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यास पुढील निवडणुकीत भाजपची साथ मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक जिंकणे अवघड वाटत असल्याने तुमाने शिंदे गटात सहभागी होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT