Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal  Sarkarnama
विदर्भ

बस्स...! आता खूप झाले, ईडीच्या विरोधात उठाव करावा लागेल!

अतुल मेहेरे

नागपूर : पूर्वी जी नावे कुणाला फारशी माहिती नव्हती, ती आता पोरासोरांच्या तोंडी आहेत, ती म्हणजे ईडी, सीबीआय, एनसीबी. धक्कादायक म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधीच भाजप नेत्यांना माहिती असते की, पुढील कारवाई कुणावर होणार आहे. आता बस्स झाले. ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आज येथे म्हणाले.

गडचिरोली येथील ओबीसी समाज मेळावा आटोपल्यानंतर परत जाण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी रविभवन येथे थोडा वेळ थांबा घेतला. यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ईडीने महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे. अधिकाऱ्यांच्या आधी भाजपच्या नेत्यांना कोणावर व कुठे कारवाई होणार याची माहिती असते. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन ईडीच्या विरोधात उठावा करावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ईडीच्या सर्व कारवाया राजकीय आहेत. फक्त महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांवरच छापे घातले जात आहेत. आजवर ईडीच्या ज्या कारवाया केल्या त्याचा तपशील जाहीर केला नाही. त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी भाजपचे नेते ईडीचा वापर करीत असल्याचे दिसून येते. ईडी आणि सीबीआयचा आजवर कुठल्याच राजकीय पक्षाने इतका गैरवापर केला नाही, तितका भाजपचे नेते करीत आहेत. भाजपचे नेते आधी हवेत आरोप करतात. नंतर ईडीला निवेदन देतात. त्यानंतर ईडीचे पथक संबंधित नेत्यांच्या घरी, कार्यालयावर धडकते. आतातर भाजपचे नेते ईडीच्या नावाने धमक्याही देत आहेत. त्यामुळे ईडीच्याच विरोधात उठाव करण्याची वेळ आली असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासूनच भाजपचे नेते सरकार पडणार असल्याचे भाकित वर्तवीत आहे. अनेक तारखा आणि मुहूर्तही जाहीर केले होते. मात्र आघाडीने सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता तर विरोधकांना राज्यात आपलाच मुख्यमंत्री आहे, असाही भास व्हायला लागला असल्याचे भुजबळ विनोदाने म्हणाले. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे जोपर्यंत ठाम आहेत तोपर्यंत राज्यातील आघाडी सरकार कोसळणार नाही. त्यामुळेच ईडी आणि सीबीआयच्या कारवायांचा खटाटोप भाजपच्या नेत्यांनी सुरू केला आहे. त्यातूनही काही साध्य होत नसल्याने भाजपचे नेते हतबल झाले असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT