Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : पाचही राज्यांतील विधानसभा फक्त सुरुवात, काँग्रेस लोकसभाही जिंकणार

Atul Mehere

Assembly Elections 2023 Exit Poll : भाजपला सत्तेचा अहंकार चढला आहे. त्यामुळं पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेसच्या बाजूनं लागतील, यात शंकाच नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस पक्षाने घेतलेल्या परिश्रमाचं हे फलित असेल, असं काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

नागपूर येथे शुक्रवारी (ता. 1) त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांसंदर्भात वर्तविण्यात आलेल्या भाकितांवर भाष्य केलं. (Leader Of Opposition Vijay Wadettiwar Says At Nagpur Congress Will Win Lok Sabha Election 2024 Including Assembly Elections 2023 In Five States)

मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या पाचही राज्यांत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचं ‘एक्झिट पोल’ सांगत आहेत. हे होणारच होतं. भाजपला आता उतरती कळा लागली आहे. मोदी, शाहांचा अहंकार याला कारणीभूत आहे.

त्यांनी सामान्यांसाठी काहीच केलं नाही, हे मतदारांच्या लक्षात आलंय. त्यामुळं केवळ पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजप तोंडघशी पडणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

शरद पवार यांचं राजकीय जीवन संपविण्यासाठी अजित पवार गटातील काही नेत्यांना भाजपनं सुपारी दिली, असं माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी म्हटलं. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सुपारी कोणी दिली, मी सुपारी पाहिली नाही आणि मला अडकित्त सुद्धा आठवत नाही.

कोणाकडे अडकित्ता आहे, कोण सुपारी आहे आणि कोण फोडणार येणाऱ्या काळात दिसेल. त्यांची लढाई कोर्टात सुरू आहे. राज्यात पक्षफोडीचा नवा उद्योग सुरू करण्यात आला आहे. जो हे कर्म करेल त्यांना ते नक्कीच फेडावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यापेक्षा सध्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकरी अडचणीत आहे. पीकविमा आधी मिळत नव्हता. आता एक रुपयात पीकविमा देत पाठ थोपटली जात आहे. विमा काढला जातोय, पण त्याची मदत मिळत नाही. पीकविमा कंपन्यांचे प्रतिनिधी गायब असतात ही वस्तुस्थिती आहे.

2022 मधील दुष्काळाची मदत अद्याप मिळालेली नाही. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ संघर्ष पेटवला जात आहे. सत्ता पक्षाच्या लोकांना यासाठी जाब विचारायला हवा. यासाठी सत्ताधाऱ्यांची ‘स्पॉन्सरशिप’ आहे. या संघर्षाचे करते करविते सत्ताधारी पक्षातील मोठे नेते आहेत.

मुंबई महापालिकेतील सगळ्या अधिकाऱ्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. या परिस्थितीत सरकार त्यांना इतक्या मोठ्या पदांवर का ठेवतेय असा प्रश्न आहे. चौकशी सुरू असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदांवर ठेवता येते का, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या कृपेने मुंबईत हे सारं सुरू आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

दत्ता दळवी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना वडेट्टीवारांनी म्हटलं की, खालच्या दर्जाचं राजकारण कोणी सुरू केलं हे शोधायला हवं. टिप्पणी करणं कोणी सुरू केलं. शिवीगाळीचा प्रकार कुठून सुरू झाला, हे महत्त्वाचं आहे. दुर्दैव आहे की राज्यातील कोणताही नेता अशी विधानं करीत आहे. बोलण्याच्या मर्यादा पाळल्या जाव्यात, अशी विनंती आहे.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT