Bhandara-Gondia Lok Sabha Constituency
Bhandara-Gondia Lok Sabha Constituency  Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : 'त्या' फोननंतर ‘या’ मतदारसंघासाठी भाजपने ठरवली आहे 'ही' पात्रता !

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : अद्याप उमेदवारी घोषित न झालेल्या जागांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक आता दिल्लीत सुरू झाली आहे. या बैठकीत भंडारा-गोंदियाप्रमाणे भाजपच्या कोट्यात आलेल्या जागांवर उमेदवार निश्चित करायचा आहे. या सर्व घडामोडीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा उमेदवार ठरविताना भाजप फार वेळ घेत असल्याचे दिसतेय. याला कारण ही तसेच आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे हेविवेट नेते, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचं गृहक्षेत्र आहे. नाना पटोले यांची भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना अधिक आहे. एका स्थानिक भाजप नेत्याने आपली उमेदवारी जाहीर होईपर्यंत नानांनी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करू नये, ही विनंती फोनद्वारे केली आहे. ही बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती पडली. त्यामुळे भाजपला नानांच्या तोडीचा उमेदवार देणे क्रमपात्र ठरले आहे. त्यामुळे भाजपचे विचारमंथन अद्याप सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत नाना पटोलेंना टक्कर देऊ शकणारा उमेदवार भाजप देणार, यात शंका नाही.

नाना पटोले यांचे राजकारण भाजपच्या नेत्यांना सर्वश्रुत आहे. नानांनी जरी आपण भंडारा-गोंदिया लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी ऐनवेळी नाना स्वतःचा एबी फॉर्म भरून निवडणूक रिंगणात उतरल्यास निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलणार यात शंका नाही आणि त्यामुळेच त्यांच्या तोडीसतोड लढत देईल, असाच उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. नानांची दहशत भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या एका स्थानिक नेत्याने तर चक्क नाना पटोले यांना फोन केला. काँग्रेसने भाजपपूर्वी तिकीट जाहीर केल्यास भाजपच्या उमेदवारांच्या रांगेतून आपला पत्ता कट होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आधी काँग्रेसने उमेदवार जाहीर करू नये, अशी विनंती केल्याची खात्रीलायक माहिती ‘सरकारनामा’ला मिळाली आहे. आता फोनद्वारे केलेल्या विनंतीची माहिती नागपूरच्या भाजप कार्यालयात पोहोचली असल्याने या सर्व घडामोडी बघता आता भाजपला तगडा उमेदवार देणे क्रमपात्र ठरले आहे.

भाजपला भंडारा-गोंदियासाठी हवाय असा उमेदवार..

भाजपचं लक्ष विदर्भ पूर्णपणे काबीज करण्यावर लागलेले आहे. सध्या विदर्भाचे नेतृत्व भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून होते आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हेविवेट नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्यातले आहे. त्यामुळे भाजपला भंडारा-गोंदिया मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाला वाढवू शकेल, असाच रुबाबदार नेता हवा आहे. ज्याचा भंडारा-गोंदियामध्ये व्यापक जनसंपर्क असेल आणि या दोन्ही नेत्यांना तोड देऊ शकेल, मुत्सद्दी राजकारणाचा ज्याला अधिक अनुभव असेल आणि मोदी लाटेव्यतिरिक्त स्वबळावर लोकसभेची जागा तो निवडून आणू शकेल, अशा उमेदवाराला भाजप तिकीट देईल, असे राजकीय जाणकार सांगतात.

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे बहुसंख्य आमदार निवडून आणण्याची क्षमता हवी, जिल्ह्यातील भाजपच्या नेते कार्यकर्त्यांना एकसंघ, एकाच पंगतीत बसविण्याचे सामर्थ्य असावे. किमान प्रस्थापित दोन नेत्यांच्या ताटाखालील मांजर बनून राहू नये, अशाच उमेदवाराच्या शोधात भाजप आहे. ही पात्रता ज्याच्या अंगी असेल, त्याच उमेदवाराचे नाव भाजप 26 मार्चला घोषित करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT