Bhandara - Gondia Constituency Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयोगाच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ पत्रामुळे ‘माहौल गरम’

अभिजीत घोरमारे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 23 जानेवारीला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार याद्या प्रसिद्ध केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एप्रिल महिन्यात निवडणुका होणार असा पक्का अंदाज वर्तविला जात आहे.

अशा परिस्थितीत 24 जानेवारीच्या सकाळपासून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय दिल्लीच्या साहाय्यक मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रातून 16 एप्रिल 2024 हा मतदानाचा दिवस राहणार, असा अंदाज निघतो आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चर्चा नुसती रंगलीच नव्हे तर चांगलीच तापली आहे.

भंडारा-गोंदिया व गडचिरोली या दोन लोकसभा मतदारसंघांत गोंदियाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची माहौल गरम होत असताना निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार कोण राहणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी, असाच सामना रंगणार आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार व निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे बॅनर-पोस्टर्स बघायला मिळत आहेत. यामुळे महायुतीकडे उमेदवारीसाठी स्पर्धा राहणार, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

असे असले तरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने या दोन्ही जागा कुणाच्या वाट्याला येणार, हा संभ्रम मात्र कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा पक्ष दोन्ही लोकसभा मतदार संघांसाठी प्रमुख मानला जात असला तरी, अद्यापपर्यंत कोणत्याही उमेदवाराचे नावे पुढे आले नाही. किंबहुना गडचिरोली लोकसभा क्षेत्र वगळता भंडारा-गोंदिया या मतदारसंघात एकाही इच्छुकाची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे वेट एण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या महाविकास आघाडीला अखेरपर्यंत उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे मे महिन्यात लोकसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा यंत्रणाही कामाला लागली आहे. मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमही राबवण्यात आले. 1 जानेवारी 2024 च्या अहर्ता दिनांकाच्या आधारावर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणेसोबत राजकीय पक्षही कामाला लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार, या बाबीची उत्कंठा सर्वसामान्य नागरिकांतही दिसून येत आहे. अशातच परवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय दिल्लीच्या साहाय्यक मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. प्रत्येक ग्रुप वर पत्राचा दाखला देत 16 एप्रिलला मतदान घेण्यात येणार, असा संदेशही पाठविला जात आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची चर्चा तापू लागली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT