Congress and Shivsena Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : ठाकरे आणि कॉंग्रेस दोघेही रामटेक सोडण्यास तयार नाहीत, कसा निघणार तोडगा ?

Atul Mehere

Lok Sabha Election 2024 : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि कॉंग्रेसने प्रतिष्ठेचा केला आहे. दोघेही रामटेकवर दावा सांगत आहेत. त्यापद्धतीने शक्तिप्रदर्शनाचीही तयारी सुरू झाली आहे. पण रामटेक जर कॉंग्रेसकडेच ठेवायचा तर सुवर्णमध्य साधावा लागेल. नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांच्या माध्यमातून हा सुवर्णमध्य साधला जाण्याची तयारी सुरू आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाला उमेदवारी दिली तरी रश्मी बर्वे याच उमेदवार राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख दावेदार काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बर्वे यांची मात्रा वापरून तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचा रामेटकवर प्रबळ दावा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सलग दोन वेळा हा मतदारसंघ जिंकला आहे.

खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. दुसरीकडे माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक हेसुद्धा या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. महाविकास आघाडीने एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असला तरी रामटेक सोडण्याची दोन्ही पक्षांची तयारी नाही. त्यामुळे जागावाटप करताना अडचणी येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेने ज्या मतदारसंघात खासदार आहेत आणि जे मतदारसंघ लढवायचे आहेत, तेथे निवडणूक समन्वयक नेमले आहेत. यात पूर्व विदर्भातील रामटेक हा एकमेव मतदारसंघ आहे. आज (ता. 23) शिवसेनेचा पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रामटेकमध्ये होणार होता. पण माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. रामटेकसाठी निवडणूक समन्वयक म्हणून प्रकाश वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा काँग्रेसच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत माजी मंत्री सुनील केदार व त्यांच्या समर्थकांनी रश्मी बर्वे रामटेकच्या उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. मात्र, केदार विरोधकांनी सर्वच इच्छुकांची नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठवावित असे सांगितले. रामटेकमधून इच्छुकांमध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांचा समावेश आहे. असे असले तरी येथून कोणी लढायचे, याचा निर्णय महाविकास आघाडीचा अद्याप झालेला नाही.

काँग्रेसने आग्रह सोडला नाही तर शिवसेनेचा उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. यावर उपाय म्हणून रश्मी बर्वे यांनाच शिवसेनेत धाडून लोकसभा लढवायची यावर सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा राखल्याचा आणि बर्वे यांच्या माध्यमातून काँग्रेसला समाधान होणार आहे. असे झाल्यास बंडखोरीची भीतीही फारशी राहणार नाही, असा विचार केला जात आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली असल्याचे समजते. त्यांनी बर्वे यांची माहिती आपल्या सहकाऱ्यांकडून जाणून घेतली असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT