Sunil Mendhe, Dr. Parinay Fuyke and Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : भाजप खासदार सुनील मेंढे तोडतील का भंडारा-गोंदियाची परंपरा?

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष आपापल्या कामाला लागलेले आहेत. दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके याचीही दावेदारी आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ‘हेवीवेट’ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी प्रफुल पटेल लोकसभेच निवडणूक लढणार नाहीत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होते. पण सद्यस्थितीतील त्यांनीही दावेदारी दाखल केल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहता 2004 पासून या मतदारसंघाने कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिली नाही. त्यामुळे भाजप सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देऊन हॅटट्रिक करतात का? की पक्ष नवा चेहरा देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना महाविकास आघाडीने अद्यापही आपला हुकमी एक्का जाहीर केलेला नाही. भाजपची जागा निश्चित झाल्यावरच महाविकास आघाडी आपला पत्ता काढेल, अशी चर्चा मतदारसंघात आहे.त्यामुळे सर्वांच्या नजरा भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीकडे लागलेल्या आहेत. या मतदारसंघात 1952 ते 1989 या काळात या काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर 1991 ते 1999 या काळात झालेल्या लोकसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीत सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले.

तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणून हा मतदारसंघ नावारूपास आला. कालांतराने 1999 ते 2004 पर्यंत भाजपने या मतदारसंघात विजय प्राप्त केल्याने तो भाजपचा गढ म्हणून ओळखला जातो आहे. पुढे 2014 मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव केला होता.

नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्याने पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर येथे पोटनिवडणूक झाली, त्यात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपने भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. त्यांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता.

यावेळी पुन्हा सुनील मेंढे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटतम सहकारी परिणय फुके यांनी आधीच फडणवीसांकडे लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे तिकीट द्यायचे कुणाला, याबाबत भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीतून ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रयत्न सुरू आहेत. या गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही येथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे असले तरी भाजप त्यांची इच्छापूर्ती करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पुन्हा सुनील मेंढे यांना तिकीट मिळते की भाजप नवा चेहरा देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT