Abhay Patil, Anup Dhotre, Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Akola Lok Sabha Constituency: अकोल्यात परिवर्तन होणार? 'या' गोष्टींचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता

Anup Dhotre Vs Praksh Ambedkar And Abhay Patil : राज्यातील अनेक चर्चेतील मतदारसंघामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसा हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो.

योगेश फरपट

Akola Lok Sabha Election 2024: राज्यातील पाचही टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं आहे. आता सर्वांना केवळ चार जूनच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यातील अनेक चर्चेतील मतदारसंघामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसा हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. कारण मागील 4 निवडणूकांमध्ये इथे सत्ता कायम ठेवण्यात खासदार संजय धोत्रेंना (Sanjay Dhotre) यश आलं आहे.

मात्र यंदा इथे महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकते आणि इथल्या मतदारसंघात परिवर्तन घडू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. अनुक्रमे 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा चार निवडणूकांमध्ये विजय मिळवत भाजपचे (BJP) खासदार संजय धोत्रे यांनी अकोल्याचा गड कायम राखला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र 2024 च्या निवडणूकीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दोन उमेदवार होते. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी खुद्द भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात येवून सभा घेतल्या.

तरीही प्रचारादरम्यान धोत्रेंना प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. शिवाय माजी आमदार नारायणराव गव्हाणकर व माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांचे काम किती केले हाही महक्वाचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी मराठा मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे जिल्हयातील 90 टक्के मराठा पाटील, कुणबी व देशमुख समाज त्यांच्यासोबत होता. शिवाय सहकार लॉबीतील नेतेही त्यांच्या सोबत प्रचारादरम्यान होते ही पाटील यांची जमेची बाजू होती.

शरद पवारांनी स्वतः स्थानिक नेत्यांशी संवाद साधून आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले होते. रिसोड मतदारसंघात प्रामुख्याने भाजप उमेदवाराला उघड विरोध झाला. त्याठिकाणी ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील बहुसंख्य असलेला मुस्लिम समुदाय हा काँग्रेस उमेदवाराच्या मागे गेल्याचं पाहायला मिळालं. अकोला पूर्व मतदारसंघ वगळता भाजप उमेदवाराला जास्त पाठिंबा मिळाला नसल्याचं चित्र होतं.

या मतदारसंघात सहकार लॉबीची मते ही निर्णायक ठरणार आहेत. ही लॉबी कोणाच्या बाजून जाणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात 1984 पासून झालेल्या 10 लोकसभा  निवडणूकीत प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात होते. तिरंगी लढतीत त्यांना आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1998 व 1999 मध्ये काँग्रेसच्या पाठींब्यावर आंबेडकर विजयी झाले होते.

सरळ लढतीत 1998 साली आंबेडकर केवळ 32,782 एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी अकोल्यात मुक्कामी थांबून आंबेडकरांना विजयी करण्यासाठी फिल्डिंग लावली होती, त्यामुळे आंबेडकर विजयी झाले होते. या मतदारसंघात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी मतदार असल्याचा अंदाज आहे. 40 वर्षाआधी भाजपाचे उमेदवार भाऊसाहेब फुंडकर यांना मिळालेली दीड लाख मते कुणबी समाजाची होती. 40 वर्षानंतर या मतांमध्ये दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे कुणबी समाजाची मते कोणाकडे जातात यावर निकालाचं चित्र अवलंबून आहे.

निवडणुकीत पुढील घडामोडी निर्णायक ठरणार -

बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी लोकसभेसाठी आखलेली रणनिती. मुस्लिम समुदायाचे मतदान कोणाच्या बाजून जाणार. तर जिल्हयातील विकास कामांमुळे भाजप विषयी असणारी नाराजी. खारपाणपट्‍यातील शेतकऱ्यांच्या समस्या. एमआयडीसीतील उद्योजकांसमोरील समस्या. वाढती बेरोजगारी, मोदी फॅक्टरचा प्रभाव कमी दिसून आला तसेच विद्यमान खासदारांविषयी मतदारांमध्ये असणारा रोष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT