Vijay Wadettiwar, Nana Patole and Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : मुलं नाही, तुम्ही लढा आणि निर्णय तत्काळ कळवा; कॉंग्रेस श्रेष्ठींची गुगली !

Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपूरचे माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी येथून लढण्याची तयारी केली आहे. त्या वरोऱ्याच्या आमदारसुद्धा आहेत. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर आमने-सामने आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात मुरलेले नेते सहसा लोकसभा निवडणूक लढवून राष्ट्रीय राजकारण करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कॉंग्रेसच्या दोन नेत्यांनी आपल्या मुला-मुलीसाठी लोकसभेची उमेदवारी मागितली. पण पक्षश्रेष्ठींनी गुगली टाकून या नेत्यांनाच अडचणीत टाकले आहे. तिसरे नेते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुणासाठीही तिकीट मागितलं नाही. पक्षाने त्यांना भंडारा-गोंदियातून लढण्यास सांगितले होते. पण मी लढणार नाही, मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणेल, अशी गॅरंटी त्यांनी दिली असल्याची माहिती आहे.

आपल्या मुला-मुलींसाठी उमेदवारी मागणाऱ्या नेत्यांनाच तुम्हाला लढायचे असेल तर लढा आणि याचा निर्णय तत्काळ कळवा, असा आदेश पक्षातर्फे देण्यात आल्याने माजी मंत्री नितीन राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अडचणीत आले आहेत. राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पक्षाकडे रामटेकमधून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागितले होते. कुणाल राऊत यांनी रीतसर अर्जसुद्धा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी दावेदारी केली आहे. यावरून काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू आहे. चंद्रपूरचे माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी येथून लढण्याची तयारी केली आहे. त्या वरोऱ्याच्या आमदारसुद्धा आहेत. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर आमने-सामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपसुद्धा केले जात आहेत. चंद्रपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपआपल्या मुलांसाठी उमेदवारी मागणाऱ्या नेत्यांनाच पक्षाने लढण्याचे आदेश दिले असल्याची सूत्रांची माहिती आहे. यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. आता दोन्ही नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाना पटोले यांनी घेतली गॅरंटी...

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपण जो उमेदवार देऊ त्यास निवडून आणू, अशी गॅरंटी घेतली आहे. त्यामुळे त्यांची सुटका झाल्याचे समजते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र कसे राहणार, याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. ही निवडणूक देशातील पुढील राजकारणाची दिशा ठरवणार, हे निश्‍चित.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT