Balu Dhanorkar, Chandrapur
Balu Dhanorkar, Chandrapur Sarkarnama
विदर्भ

Maharashtra : जुनी पेंशन इतकाच सेवानिवृत्तीचाही मुद्दा महत्वाचा, आमदारांनी सभागृहात मांडावा…

सरकारनामा ब्यूरो

One Mission - Old Pension and Retirement News : ‘एकच मिशन - जुनी पेंशन’च्या घोषणा देत राज्यातील कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराजधानी दणाणून सोडली होती. जुनी पेंशन न दिल्यास त्याचा फटका सरकारला बसेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी तेव्हाच दिला होता. पण सरकारने तो गांभीर्याने घेतला नाही. त्याचा फटका भाजपला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत बसला.

महाराष्ट्रासाठी जुनी पेंशन योजना हा विषय महत्वाचा आहेच, पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्ष आहे. त्याप्रमाणे राज्यातदेखील शिक्षक आणि सर्व इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्याची गरज आहे. सेवानिवृत्तीचा हा प्रश्न राज्यात महत्वाचा आहे. तो नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात मांडवा, असे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी डॉ. बबनराव तायवाडे यांनी आपल्या पदाचा त्याग केला. भविष्यात त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असा शब्दही खासदार धानोरकर यांनी यावेळी दिला. सुधाकर अडबाले यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घालून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य पदासाठी अगदी योग्य उमेदवार शिक्षकांनी निवडून दिला आहे.

आमदार अडबाले आपल्या शिक्षकांसह सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरतील याबद्दल संशय नाही, असेही खासदार धानोरकर म्हणाले. जुनी पेन्शन योजना नक्कीच लागू होईल, असा विश्वास यावेळी आमदार प्रतिक्षा धानोरकर यांनी व्यक्त केला.

शिक्षकांवर देशाचे सुजाण व चारित्र्यसंपन्न नागरिक घडविण्याची मुख्य जबाबदारी असताना निवडणुका, आरोग्य विभाग इत्यादींमध्ये गुंतविले जाते. शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिकविण्याचेच काम फार मोठे व जबाबदारीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षकेतर कामांचा बोझा लादू नये, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ‘एकच ध्यास - वैयक्तिक विकास’ या उद्दिष्टाने चालणारी भाजप प्रणीत सरकार उलथवणे आता गरजेचे झाले असल्याचेही खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) म्हणाले. आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार सोहळ्यात चंद्रपूर येथे ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार व्ही. यू.डायगव्हाणे, डॉ. बबनराव तायवाडे, (Babanrao Taywade) सीमा अडबाले, जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष वितेश खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे, चंद्रपूर शहर काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, परशुराम धोटे, प्रा.अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य शाम धोपटे, विज्युक्टा अध्यक्ष राजेंद्र खाडे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखंडे राजेश नायडू, संभाजी ब्रिगेड नेते दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT