Mahavikas Aghadi's Agitation Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aghadi Movement : महाविकास आघाडीच्या आंदोलनात तृतीयपंथी; आमदार नाईकांची केली हाय.. हाय...!

Pusad : घरकुलासाठी आता थेट नगर परिषदेलाच टाळे ठोकण्याचा इशारा.

सतीश हरिश्चंद्र येटरे

Mahavikas Aghadi Movement : घरकुलासाठी आमदार हाय.. हाय... म्हणत पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांच्यावर तृतीयपंथीयांनी टीकेची मोठी झोड उठविली आहे. नव्हेतर स्वतःच्या वाढदिवसाला 11 लाखांचा मंडप आणि आम्ही गरीब लोक उघड्यावर असे म्हणत आमदार नाईक यांचे चांगलेच उट्टेही काढले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जात, त्यांना मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास नगर परिषद कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.

घरकुलाच्या लाभासाठी नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांना नमुना ड दिला जात नाही. त्याचबरोबर 2018 मध्ये मंजूर 300 घरकुलांचे अनुदान रखडले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुढाकार घेत गत 9 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषदेविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. दखल घेतली जात नसल्याने आता नगरपरिषदेवर 1 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान आंदोलकांच्या अनोख्या आंदोलनाने सर्व नागरिकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. घरकुलासाठी आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीला तृतीयपंथीयांची साथ मिळते आहे. दरम्यान, तृतीयपंथीयांनी मुख्याधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

पुसद नगरपरिषदेच्या कामकाजावरून सध्या सामान्य नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुलासाठी नमुना ड प्रमाणपत्राची गरज आहे. मात्र, नगरपरिषदेकडून हे प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून गत 9 दिवसांपासून महाविकास आघाडीने साखळी उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयापुढे हे उपोषण सुरू असताना मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे

आजवर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे उपोषणकर्ते संतापले आहे. 16 जानेवारीपासून हे उपोषण सुरू असून नागरिकांना तातडीने नमुना ड प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 2018 मध्ये शासनाने घरकुल मंजूर केले होते. मात्र, त्याचे अनुदान रखडले आहे. हे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर वंचित घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरपरिषद प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आता प्रशासनाला जागे करण्यासाठी 1 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 31 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन आम्ही करू, असा अल्टिमेटम निवेदनातून दिला आहे. या उपोषणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष दरणे, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष साकिब शाह जानुल्ला शाह, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांसह त्यांचे समर्थक सहभागी झाले आहेत..

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT