Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election Result: महाविकास आघाडीचा जल्लोष सुरू, ‘जुनी पेन्शन’ने केला भाजपचा पराभव!

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Division Teachers Constituency Elections : महाविकास आघाडी समर्थीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे सद्यःस्थितीत १४ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत नागपुरात जल्लोष सुरू केला आहे.

आता विजय आमचाच आहे. फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. पहिल्या फेरीतच विजयश्री आमच्याकडे येईल, असे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना नाकारणे भाजपला भोवले असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ शकत नाही, असे वक्तव्य केले होते. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे, तेथे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मान्य केली आहे. तीच मागणी महाराष्‍ट्रात आमच्या कर्मचाऱ्यांकडून होते आहे. पेन्शन देऊ शकत नाही, अशी भूमिका ज्या पक्षाची आहे, त्या पक्षाचे समर्थन घेऊन जे प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. त्यांची ही स्थिती झाली आहे. प्राध्यापक, शिक्षक, आयटीआयचे निदर्शक किंवा इतर कर्मचारी असो, हा सामूहिक प्रश्‍न आहे. सामूहिक प्रश्‍नांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि निकाल आपल्यासमोर आहेत, असे सुधाकर अडबाले म्हणाले.

आमच्या संघटना कॉंग्रेस विचारांच्या..

आजच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेले बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र राहिलो. आम्ही पूर्वीपासून कॉंग्रेसच्या विचारांचे आहोत. सर्वच्या सर्व ३४ संघटनांना आम्ही एकत्रित केले. त्यांच्यात एकमत घडवून आणले. सुधाकर अडबालेंना उमेदवारी दिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे भूमिका मांडली. आम्ही त्यांच्याच विचाराचे आहो, हे त्यांना सांगितले. शिक्षक मतदारसंघ हा संघटनांचा मतदारसंघ आहे, राजकीय नाही, हे आम्ही कॉंग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले. यामध्ये आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांनी ते मान्य केले.

अरेरावीने राजकारण करणाऱ्यांसाठी इशारा..

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेले काम आणि संघटनांच्या एकजुटीचा हा विजय आहे. संघटनांचा विचार आणि महाविकास आघाडीचा विचार एक आहे. आम्ही एकत्र आल्यावर भाजप कुठे दिसणारच नाही, हे आज सिद्ध झाले. पहिल्या पसंतीमध्ये निकालाच्या घटना तुरळक आहे आणि नागपुरात हे घडले. विजयाची खात्री कॉंग्रेसला होती, साथ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने दिली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून आमच्या विजयी मालिकेला सुरुवात झाली, ती आता शिक्षक मतदार संघापर्यंत आली आहे. पुढे काय होईल, त्याचा विचार आमच्या विरोधी पक्षाने विचार करावा. अरेरावीने राजकारण करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे, असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT