Mahayuti Politics  Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Politics : फडणवीसांच्या गडातच महायुतीत वाद; भाजपची शिवसेना-राष्ट्रवादीवर कुरघोडी?

Vidarbh Mahayuti Politics : भाजपच्यावतीने बैठका घेऊन निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rajesh Charpe

Nagpur : भाजपच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन निवडणुकीची तयारी केली जात आहे. भाजपचे नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कैलाश विजय वर्गीय हे बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीसाठी दावा केलेल्या विधानसभा मतदारसंघात ते बैठका येत असल्याने महायुतीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात कमळ चिन्हावरच निवडणूक लढली जाणार असल्याच्या वक्तव्याने महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रामटेक विधानसभा (Ramtek Vidhansabha) मतदारसंघात आशिष जयस्वाल आमदार आहेत. मूळचे शिवसैनिक असलेले जयस्वाल अपक्ष निवडून आले होते. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. राज्य खनिकर्म महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. असे असले तरी त्यांनी अद्याप शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे रामटेकमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. जयस्वाल यांची उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही जवळीक आहे. ते भाजपात जातील अशीही चर्चा अधून मधून सुरू असते.

रामटेकमधील भाजपचे (BJP) स्थानिक पदाधिकारी व माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा जयस्वाल यांना विरोध आहेत. निवडणूक प्रभारी विजयवर्गीय यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत जयस्वाल यांच्या नावाचा कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. मल्लिकार्जून रेड्डी यांनी मात्र निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे मागील विधानसभेची निवडणूक रेड्डी विरुद्ध जयस्वाल अशीच झाली होती. हे बघता जयस्वाल भाजपात आल्यास रेड्डी हे बंडखोरी करतील असेच चित्र सध्या रामटेकमध्ये आहे. हे सर्व बघता महायुतीचे जागा वाटप झाल्याशिवाय आमदार जयस्वाल हे कुठल्या पक्षात जाणार नाहीत असे दिसते.

काटोल विधानसभा (Katol Vidhan Sabha Election) मतदरासंघावर अजित पवार यांनी दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या न्याय सन्मान यात्रेचा प्रमुख कार्यक्रम काटोलमध्ये घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या. या मतदारसंघातून शरद पवार यांच्यासोबत असलेले अनिल देशमुख निवडून आले आहेत. ते राष्ट्रवादीचे असल्याचे काटोलवर अजित पवार यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेसोबत भाजपची युती असताना रामटेक हे शिवसेनेकडे होते. महायुती तुटल्यानंतर भाजपचे रेड्डी येथून निवडून आले होते. नंतरच्या निवडणुकीत आशिष जयस्वाल यांनी अपक्ष लढून पराभवाचा बदला घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT