Nagpur, 02 September : महायुतीचे जागा वाटप येत्या दहा दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात येते. भाजप नेत्यांनीही तसा दावाही केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही लवकरात लवकर जागा वाटप जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता जागा वाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाष्य केले आहे. महायुतीमधील नेत्यांचे 176 जागांवर एकमत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे महायुतीमध्ये 112 जागांबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Mazi Ladaki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम नागपूर येथे घेण्यात आला. त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे (Mahayuti) बहुतांश नेते शनिवारी नागपूरमध्ये मुक्काम होते. यावेळी तीनही प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत खलबते झाली.
विधान परिषदेच्या जागेबाबतही या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 176 जागेवर आमच्यामध्ये कुठलेच मतभेद नसल्याचे सांगितले. उर्वरित 112 जागा कुठल्या आणि कोणाच्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकणी ज्या पक्षाचे चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत, तेथे एक पाऊल आम्ही मागे घेऊ. विरोधकांना रोज काही तरी आरोप करायचे असतात. आता त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात येणार असल्याचा आरोप केला आहे. ते रोज खोटे बोलत आहेत.
विधानसभेची निवडणूक २६ नोव्हेंबरनंतर पुढे ढकलता येत नाही. त्या पूर्वी विधिमंडळ गठीत करावे लागणार आहे. त्यानुसार विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
एकनाथ खडसे काय बोलले हे मला माहिती नाही. त्यांनी लोकसभेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. रक्षा खडसे यांना मदत केली. पुढच्या काळात ते आमच्या सोबत राहतील, असा विश्वास आहे. या वेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना हात जोडत असल्याचे सांगितले.
जरांगे पाटील यांचा आम्ही आदर करतो. सुरुवातीला त्यांचे आंदोलन सामाजिक होते. आता ते सकाळपासून संध्याकाळीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना संबंध नसताना टार्गेट करतात.
मराठा समाजावर सगळ्यात जास्त अन्याय शरद पवार यांनी केला. त्यांचे ते नावही घेत नाहीत. त्यांच्या सामाजिक आंदोलनाची भूमिका बदलली आहे. ते आता राजकीय होत असल्याचे दिसून येते, असेही बावनकुळे म्हणाले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.