Nagpur News : सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे आणि विधान परिषदेत रमी खेळताना आढळलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अखेर खाते बदलण्यात आले. हा शिवसेनेच्या मंत्र्यांना इशारा मानला जातो. कोकाटे यांच्या नंतर शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांना बदलले जातील, अशी चर्चा राज्यात सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली. आता खांदेपालट होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच हा बदल सर्वच मंत्र्यासाठी संकेत आहे, असे सांगून त्यांनी मंत्र्यांना शिस्तीत राहण्याचा व वागण्याचा सल्ला दिला.
कोकाटे यांच्याप्रमाणे शिंदे सेनेचे संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनाही बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी त्यांचा बनियनवर बसलेला एक फोटो व्हायरल केला होता. त्यांच्या बेडवर पैशाची बॅग असल्याचाही आरोप केला होता. पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लुंगी बनियनवर येऊन आमदार निवासातील वेटरला मारहाण केली होती.
यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. चड्डी बनियान टोळी असे फलक झळकावले होते. हे आरोप होत असताना संजय सिरसाठ यांचे अनेक वादग्रस्त वक्तव्य, हॉटेलचा सौदा ही प्रकरण समोर आली होती. त्यामुळे कोकाटे यांच्यासोबतच सिरसाठांना डच्चू मिळणार किंवा खाते बदलणार अशी चर्चा सुरू होती.
सिरसाठ यांनी लाडक्या बहिणीसाठी समाज कल्याण विभागाचा निधी वळवल्याचा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केला होता. यावरून महायुती सरकार चांगलेच अडचणीत आले होते. मुख्यमंत्र्यांना या निधीबाबत खुलासा करावा लागला होता. या सर्व प्रकरणावर तीनही नेत्यांची एकत्रित बैठक झाली होती. मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त मंत्र्यांना तंबी दिली होती. बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांना हे खपवून घेणार नाही, कारवाई केली जाईल, असे कडक शब्दात सुनावले होते.
कोकाटे यांच्याबाबत खाते बदलाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली. चर्चांअंती खाते बदलाचा हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. त्यांना दुसरे खाते देण्यात आले आहे. कृषी खाते भरणे यांना देण्यात आले आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल, अशी कोणतीही चर्चा नाही. हे सर्वांसाठी संकेत आहेत. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. आपण काय बोलतो, कसे वागतो, आमचा व्यवहार कसा आहे हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही
कोकाटे यांचा खातेबदल सुरू असताना माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे अजित पवार यांना भेटले. फडणवीस यांनाही भेटले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी तीन वेळेला माझी भेट घेतली. ती वेगवेगळ्या कारणाने भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही. ती मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.