Suresh Dwadashiwar, Vidarbha
Suresh Dwadashiwar, Vidarbha Sarkarnama
विदर्भ

मनोहर म्हैसाळकरांचे निधन झाले अन् सुरेश द्वादशीवारांचे नियोजित अध्यक्षपद गेले !

Atul Mehere

नागपूर : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कादंबरीकार सुरेश द्वादशीवार यांचे नाव वर्धा (Wardha) येथे होऊ घातलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जवळपास निश्‍चित झाले होते. पण नंतर अशा काय घडामोडी झाल्या की नियोजित अध्यक्ष असलेले द्वादशीवार यांचे नाव मागे पडून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांनी स्वतः सुरेश द्वादशीवार यांचे नाव निश्‍चित केले होते. विदर्भ (Vidarbha) साहित्य संस्था ही ९६ व्या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. विदर्भ साहित्य संघाने अध्यक्षपदासाठी सुरेश द्वादशीवारांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळ आणि सर्व घटक संस्थांना पाठविला होता. म्हैसाळकर यांनी स्वतः सर्वांना फोन करून द्वादशीवारांच्या नावाला पूर्व मंजुरी मिळवली होती. गोवा (Goa) येथे होणाऱ्या बैठकीत द्वादशीवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होते. परंतु बैठकीच्या आदल्या दिवशीच म्हैसाळकरांचे निधन झाले आणि बैठक रद्द झाली. त्यामुळे म्हैसाळकरांचे निधन झाले, अन् त्यामुळे सुरेश द्वादशीवारांचे नियोजित अध्यक्षपद गेले, अशी चर्चा साहित्य क्षेत्रात होत आहे.

मनोहर म्हैसाळकर असताना ज्यांनी-ज्यांनी द्वादशीवारांच्या नावाला होकार दिला होता, त्यांनी म्हैसाळकरांच्या निधनानंतर आधीच्या भूमिकेवरून घूमजाव केले. त्यानंतर नवीन नावाचा शोध सुरू झाला. त्यातून मग माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांचे नाव पुढे आले. ते बिनविरोध निवडले जातील, अशी स्थिती परवा परवापर्यंत तरी नव्हती. तेव्हाही द्वादशीवारांच्या नावाची चर्चा कुठेतरी सुरू होती. पण नंतर मग त्यांचे नाव गायबच झाले आणि चर्चा बंद झाली. नंतर चपळगावकर यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. या घडामोडींच्या मागचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आयोजकांमधील मुख्य असलेल्या एका व्यक्तीला मंत्रालयातून (Mantralaya) एक कॉल आला. त्यानंतर चपळगावकरांचे नाव निश्‍चित झाले, अशी माहिती आहे.

साहित्य महामंडळाच्या बैठकीत आयोजकांमधील महत्वाच्या व्यक्तीला असे सांगण्यात आले की, द्वादशीवारांचे नाव ठरवत असाल तर सरकारकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नका. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्यांमध्येही मतभेद झाल्याची माहिती आहे. पण मुख्य आयोजकांचादेखील नाईलाज झाला आणि द्वादशीवारांचे नाव मागे पडून चपळगावकर यांचे निश्‍चित झाले, अशी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत द्वादशीवारांच्या नावासोबत घटक संस्थांतर्फे देण्यात आलेल्या इतर नावांवरही चर्चा झाली नाही, जी होणे आवश्‍यक होते. पण तसे न होता अचानक चपळगावकरांचे नाव चर्चेत आले आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या निवडीवर मंत्रालयाचा (Mantralaya) प्रभाव आहे, अशीही चर्चा साहित्य क्षेत्रात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT