Maratha Reservation News : मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारने मागून घेतलेल्या ४० दिवसांच्या मुदतीपैकी ३० दिवसांचा कालावधी संपला आहे. आरक्षण मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर अंतरवालीतून मोठा शंखनाद केला आहे. (Violation of reservation will be celebrated on Vijayadashami this year)
आता सरकार जवळ आरक्षण देण्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी उरला आहे. अशात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास चाळीसाव्या दिवशी खरे आंदोलन काय असते ते दाखवून देऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज आई तुळजाभवानीचा मोठा भक्त आहे. देवीचे कठोर उपासक म्हणून मराठा समाजाकडे पाहिले जाते.
आपल्या नेत्याला काही होऊ नये व मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळावेत, यासाठी राज्यातील संपूर्ण मराठा समाजाने आता आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी दिलेली अंतिम मुदत ऐन नवरात्र संपताना पूर्ण होत आहे. त्यामुळे आई तुळजाभवानीने आपल्या भक्तांना पावत आरक्षणरूपी आशीर्वाद प्रदान करावा, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
ओबीसी समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला कदाचित अनेक मुद्द्यांवर सीमोल्लंघन करावे लागू शकते. अशात आरक्षण देण्यासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी उरल्यामुळे. राज्य सरकारला मराठा समाजासह सर्वांचाच विजयादशमी उत्सव आनंदात साजरा व्हावा, यासाठी तारेवरची चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
राज्य सरकारने कितीही ठरवले तरी मराठा समाजाला आरक्षण देताना काही बाबतीत सरकारला सीमा ओलांडाव्या लागणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा हा वाद अधिक चिघळू नये व त्यातून राज्याची कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी राज्यकर्त्यांनीही देवीला साकडं घालणं सुरू केलं आहे. आदिशक्तीचं हे नवरात्र अनेक संकटांना टाळून नेतं असा अनेकांचा विश्वास आहे. अनेकांची श्रद्धा आहे.
आरक्षणाच्या आडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या असुरी शक्तींचा अंत व्हावा, अशी प्रार्थना सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मराठ्यांसह विविध समाजांतील बांधव करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील पेटलेले रण शांत व्हावे, यासाठी सरकारमधील नेत्यांनीही नवरात्राच्या तोंडावर देवीचा धावा करणे सुरू केले आहे. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी देवी राज्यकर्त्यांना कशी सद्बुद्धी देते व त्यातून ते कोणता मार्ग काढतात, हे येत्या दहा दिवसांत दिसणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.