Nagpur News, 08 Oct : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. यास राज्यातील ओबीसी नेत्यांनी कडाकडून विरोध केला आहे. हा जीआर रद्द करावा अशी मागणी केली जात आहे.
या जीआरच्या विरोधात सकल ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी जरांगेवर निशाणा साधला आहे.
जरांगे बालबुद्धिचा आहे. त्याच्या बोलण्यात काही तारतम्य नसते. उचलली जीभ लावली टाळ्याला असेच त्याचे सुरू असून जशी बुद्धी तशी वृत्ती अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी जरांगेवर केली आहे. यावरून आता जरांगे विरुद्ध वडेट्टीवार या नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार आंदोलन व उपोषण करून मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला अडचणीत आणत होते.
जरांगे यांच्या मागणीनुसार महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी-मराठा अशी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे. जरांगेंच्या आग्रहावरून तसा जीआरसुद्धा काढला आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये मोठा असंतोष उफाळला आहे. ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जीआरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही असा दावा केला आहे. ओबीसीच्या मागण्या मान्य करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची एक उपसमिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. सकल ओबीसी महासंघाने मोर्चा काढू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीने ओबीसी नेत्यांचे समाधान झाले नाही. ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. दरम्यान, मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जरांगे यांच्या रडारावर हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी करणारे काँग्रेस नेते आले आहेत. त्यांनी थेट राहुल गांधींनाच टार्गेट केले. राहुल गांधी हा दिल्लीचा लाल्या आहे, अशी टीका जरांगे यांनी केली आहे.
यावर वडेट्टीवार यांनी जरांगे हा लहान वयातला बाल्या असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र यातूनच मिळाले पाहिजे, त्यातून मिळाले पाहिजे हे योग्य नाही. दुसऱ्याच्या ताटातून ओढून घ्या ही भूमिका बरोबर नाही. आमच्या ताटातून घेऊ नका, तुम्हाला जे हवे ते तुम्ही तुमच्या ताटात घ्या, पाहिजे तेवढे घ्या, सरकारकडून मागून घ्या, पोट भरेपर्यंत घ्या. आमचे काही म्हणणे नाही.
हा काही माझा मेळावा नाही. सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला आहे. मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. माझ्या नेतृत्वात हा काही मोर्चा नाही. सगळ्यांना आमंत्रण आहे. ज्यांना ज्यांना यायचा आहे ते येतील आणि मोर्चात आपली भूमिका मांडतील. आम्ही सर्वाचंच स्वागत करू. जरांगेच्या माध्यमातून ओबीसीचे आरक्षण सरकार घालवू पाहते अशी भीतीही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.