Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर मराठवाड्यात होतेय 'जरांगे पाटील नगर'

सतीश हरिश्चंद्र येटरे

Hingoli News : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे-पाटील हे प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला आर्थिक बळ कुणाचे? त्यांची आर्थिक परिस्थिती काय? त्यांची संपत्ती किती, असे विविध प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. असे असले तरी जरांगे-पाटलांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आपली जेमतेम संपत्ती घोषित केली.

त्यात शेतीव्यतिरिक्त काहीच नव्हते. मात्र बळसोंड या गावातील एका नगरात जरांगे-पाटील यांच्या नावे एक मोठे ले-आऊट आहे. 'जरांगे-पाटीलनगर बळसोंड' असे फलक असलेल्या ले-आउटचे छायाचित्र सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.

जरांगे-पाटलांकडे त्यांची वैयक्तिक संपत्ती नसली तरी ज्या पद्धतीने त्यांनी मराठा आंदोलनाचा लढा लढला. तेव्हापासून मराठा समाज हीच त्यांची मोठी संपत्ती झाली आहे. अशातच त्यांच्या एका चाहत्याने आपल्या ले-आऊटला 'जरांगे पाटीलनगर बळसोंड' असे नाव दिले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्यावेळी अंतरवाली सराटीसह संपूर्ण राज्यात आंदोलन पेटले. तेव्हा या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जरांगे-पाटील चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले.

मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी घेतली. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा, तर ओबीसींचा जरांगे-पाटलांना विरोध सहन करावा लागला. तेव्हा काहींनी जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला आर्थिक बळ कुणाचे? त्यांची आर्थिक परिस्थिती काय? असे विविध प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्या स्थितीतही जरांगे-पाटील तसूभरही डगमगले नाही. जरांगे-पाटलांनी दंड थोपटत विरोधकांना उत्तर देण्यासाठी आपली जेमतेम संपत्ती घोषित केली. त्यात शेतीव्यतिरिक्त काहीच नव्हते. शिवाय आरोप करणाऱ्यांनी सामोरे यावे, रुपया-रुपयाचा हिशेब देऊ, असे आव्हान दिले. त्यांची सर्वसामान्य परिस्थिती पुढे आल्यानंतर मात्र अनेकांची बोलती बंद झाली. त्यानंतर संपत्ती आणि आंदोलनाच्या आर्थिक बाबीवरून कुणीही उघडपणे आरोप-प्रत्यारोप केले नाहीत.

असे असले तरी बळसोंड या गावातील एका नगरात जरांगे-पाटील यांच्या नावे फलक असलेल्या ले-आउटचे छायाचित्र अलीकडेच पुढे आले. नव्हे तर या नगरीच्या फलकाचे छायाचित्र सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे. त्यातून अनेकांचा वेगळा समज झाला. जरांगे-पाटील यांचे तर ते ले-आउट नाही ना, असा संशय घेतला जाऊ लागला. मात्र वास्तविकता काही वेगळीच आहे. ज्यांना वास्तव माहीत झाले. ते आता 'खोदा पहाड, निकला चूहा' म्हणत तोंडात बोटे घालू लागली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चाहत्याने व्यक्त केले प्रेम..

एका सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटविले. नव्हे तर आपल्या मागणीपुढे सरकारलाही झुकायला लावले. त्यामुळेच ते संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. ते आज अनेकांचे "आयडॉल" ठरत आहेत. अशाच एका चाहत्याने जरांगे-पाटील यांच्याप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करीत बळसोंड या गावातील ले-आउटला जरांगे-पाटीलनगर नाव दिले. नव्हे तर आता जरांगे-पाटील यांच्या प्रसिद्धीचा त्याने चाणाक्ष बुद्धीने व्यवसायासाठी वापर केल्याचेही बोलले जात आहे. हा व्यक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि ग्रामपंचायतीचाही पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT