Maoist Arrested Sarkarnama
विदर्भ

Maoist Arrested : दोन लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांनी पकडला!

Gadchiroli News : गडचिरोलीमध्ये स्थापना सप्ताह साजरा करणाऱ्या माओवाद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केली तीव्र मोहीम

प्रसन्न जकाते, संदीप रायपूरे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असताना, गडचिरोलीमध्ये स्थापना सप्ताह साजरा करणाऱ्या माओवाद्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या तोडघट्टाजवळ खान प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदिवासी नेत्यांनी पोलिसांना घेरलं होतं. त्यानंतर माओवाद्यांविरुद्ध कारवाई तीव्र होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

अशात गडचिरोली जिल्ह्यात अभियान राबवत असलेल्या पोलिसांच्या हाती एक जहाल माओवादी लागला आहे. त्याच्यावर सरकारने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बुधवारी (ता. 6) या माओवाद्याला अटक करून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महेंद्र किष्टय्या वेलादी (वय 32, रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बिजापूर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव आहे. उपपोलीस स्टेशन दामरंच्या जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलिसांच्या हालचालींबाबतची माहिती देण्याच्या उद्देशाने महेंद्र फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ 9 बटालियन-जी कंपनीचे जवान व दामरंच्या पोलिसांनी अभियान राबवत महेंद्रला अटक केली.

तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोलिस पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. या पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या माओवाद्यांना तो माहिती पुरवत होता.

2023 च्या सुरुवातीला कापेवंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिका­ऱ्यांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये महेंद्रचा प्रत्यक्ष सहभाग होता. महेंद्र किष्टय्या वेलादी याने 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीमचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. माओवादी चेरपल्ली जंगल परिसरात आल्यानंतर तो त्यांची सेंत्री ड्युटी करायचा.

2010 पासून तो नॅशनल पार्क, बिजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआयचा (एम) चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता. त्यानंतर महेंद्र नॅशनल पार्क एरिया, बिजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता. दोन चमकीत त्याचा सहभाग होता.

डिसेंबर 2017 मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात मोठी चकमक झाली होती. डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बिजापूर पोलिसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्येही तो सहभागी होता. 2023 मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणा­ऱ्या रोडवरील जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचा­ऱ्यांना मारहाण करीत त्यांचे वाहन महेंद्रने जाळले होते.

याचबरोबर 2023 मध्ये सॅण्ड्रा गावातील एका निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT