Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation News : मराठ्यांचा आग्या मोहोळ शांत आहे, त्याला उठवू नका; जरांगे पाटलांचा सरकारला गर्भित इशारा !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Manoj Jarange Antarwali Sarati sabha : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेला मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. या ऐतिहासिक सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी गर्दीकडे एक कटाक्ष टाकीत मराठ्यांचा आग्या मोहोळ हा सध्या शांत आहे. त्याला उठवू नका, असा गर्भित इशारा केंद्र आणि राज्य सरकारला दिला. (It has been warned not to see the end of patience)

नव्हेतर संयमाचा अंत पाहू नका, अशी चेतावणीच दिली आहे. मराठवाड्यासह राज्यातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या, यासह ५० टक्क्यांच्या आतील आरक्षणात समावेश करा, आदी मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे मागील काळात आमरण उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी सरकारला मराठा आरक्षण प्रक्रियेसाठी मुदत देत आंदोलन मागे घेतले होते.

शिस्तबद्ध सभा

या मुदतीत त्यांनी राज्यभर दौरे करून मराठा समाजाची मोट बांधली. तत्पूर्वीच त्यांनी १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधवांचे लोंढेच्या लोंढे अंतरवालीत कालपासूनच दाखल झाले. शांततेत पार पडत असलेल्या या सभेत लाखो मराठा बांधव जरांगे पाटील काय भूमिका जाहीर करतात, याकडे लक्ष देऊन होते.

सभेला जमलेली गर्दी पाहून जरांगे पाटीलही क्षणभट अंतर्मुख झाले. या वेळी बोलताना त्यांनी कोण म्हणतं की, मराठ्यांचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला हा समाज आहे. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मराठा बांधव सभास्थळी दाखल झाले. कुठलाही अनुचित प्रकार सभेला येताना आणि सभा सुरू असताना घडला नाही. ही बाब पोलिसांनीच आपल्याला सांगितल्याचा उल्लेख करीत जरांगे पाटलांनी एक कटाक्ष गर्दीवर टाकला.

पुढचे आंदोलन अधिक तीव्र

त्यानंतर मराठ्यांचा आग्या मोहोळ सध्या शांत आहे. त्याला उठवू नका, असे म्हणताच गर्दीतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या कडकडाटातच जरांगे पाटलांनी केंद्र व राज्य सरकारला गर्भित इशारा दिला. आग्या मोहोळ ही मधमाश्यांची प्रजात अतिशय शांत असते. मात्र, कुणी या माश्यांच्या वाट्याला गेल्यास ती अतिशय हिंस्र होते. हिंस्र आग्या माश्यांनी आजवर अनेकांचे बळी घेतले.

इशारा नव्हेतर चेतावणीच आग्या मोहोळची मराठ्यांना उपमा देत जरांगे पाटलांनी केंद्र व राज्य सरकारला दिल्याचे अनेकांना जाणवले. आगामी दहा दिवसांनंतर जरांगे पाटील हे पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. पुढचे आंदोलन हे यापेक्षा तीव्र राहील, असे सूतोवाच जरांगे पाटलांना आज केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT