Maharashtra Politics : दोन दिवसांनंतर येणारा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 14 फेब्रुवारीला मुंबईत काँग्रेस विधिमंडळाची बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतून राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’वर नेमके कोण आणि किती प्रेम करते, हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट होणार आहे.
भाजप देशात ‘नफरत’ पसरवित आहे, असा आरोप काँग्रेस करते. द्वेषाच्या या राजकारणात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ‘मोहब्बत की दुकान’ उघडली. राहुल यांच्या दुकानातील ‘प्रॉडक्ट’ (नेते) मात्र मतदारांना फारसे भावले नाहीत. त्यामुळे अलीकडेच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसचे ‘शटर डाऊन’ केले. आर्थिक कोंडी करीत भाजपने काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ला टाळे लावले.
अशातच भाजपने महाराष्ट्रात ‘करेक्ट टायमिंग’ साधत अशोक चव्हाण यांच्या रुपाने एक मोठा ‘मासा’ गळाला लावला. चव्हाण काँग्रेसच्या ‘मोहब्बत की दुकान’मधून अनेक चेहरे ‘ठोक’ स्वरुपात घेऊन भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चव्हाणांसोबत ‘इनकमिंग’ करणाऱ्यांना खास ‘फेस्टिव्हल ऑफर’ दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहत्या पाण्यात भाजपच्या ‘सॅनिटायझर’ने ‘हात’ धुवून घेत भ्रष्टाचाराचे कथित सर्व डाग पुसत ‘सफेदी की चमकार’ मिळविण्यासाठी अनेक आमदार प्रयत्नशील आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन दिवसांनंतर होणार ‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाला पाश्चात्य संस्कृतीत खुपच महत्त्व आहे. अशातच काँग्रेसचे सर्वोच्च नेते ‘इंम्पोर्टेड’ असल्याचा आरोप करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत काँग्रेसचे किती आमदार विधिमंडळाच्या बैठकीत पक्षाला ‘आय स्टिल लव्ह यू’ असे म्हणणार याची उत्सुकता आहे.
‘व्हॅलेंटाइन्स डे’ला आपल्या खऱ्या प्रेमाला गुलाबपुष्प दिले जाते. परंतु याच दिवशी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत आमदार पक्षाला गुलाब देणार की ‘मोहब्बत की दुकान’मध्ये गुलाब हाती धरुन असलेल्या नेत्यांचा ‘पंजा’ छाटत ‘कमळ’ हाती घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशोक चव्हाण यांचे अनेक चाहते विदर्भात आहेत. अशात ‘व्हॅलेटाइन्स विक’ सुरू असताना ऐन ‘हग डे’च्या दिवशी चव्हाणांनी काँग्रेसच्या मगरमिठीतून सुटका करून घेत भाजपला ‘मिठी’ मारण्याची तयारी चालविली आहे. अशात काँग्रेसला ऐन ‘व्हॅलेटाइन्स विक’मध्ये चव्हाणांनी प्रेमभंग केल्याचे दु:ख भोगावे लागत आहे. चव्हाणांनी काँग्रेससोबत केलेल्या या ‘ब्रेकअप’नंतर हृदयाला पीळ पडल्यामुळे पाणावलेल्या डोळ्यांनी पक्षातील नेत्यांनी आपल्या सोबत्यांना साथीचा ‘हात’ मागितला आहे. ‘ब्रेकअप’नंतरच्या ‘ट्रॉमा’मध्ये असलेल्या काँग्रेसला विदर्भातील आमदारांकडून आधार हवा आहे.
अशोक चव्हाण यांनी ‘लेट्स गेट सेपरेटेड’ असे काँग्रेसला सांगितल्यानंतर अपेक्षेनुरूप पहिला राजीनामा नांदेडातूनच आला. माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसला ‘हम आकपे है कौन?’ म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्हालाच बहुमत मिळेल असा दावा करणाऱ्या काँग्रेसची अवस्था ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटातील नायक राजकुमार यादवसारखी झाली आहे, ज्याच्या प्रेमविवाहातील वधू ऐन बोहल्यावर चढण्याच्या वेळी एक चिठ्ठी लिहून निघून जाते. असाच एक अनपेक्षित ‘लेटरबॉम्ब’ सोमवारी (ता. 12) सकाळी अशोक चव्हाण यांनी टाकला व राजकुमार यादवसारखी सारखे काँग्रेस नेते थक्कच राहिले.
चव्हाणांच्या या कृतीनंतर आता प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे ‘मोहब्बत की दुकान’च्या मालकांना भेटण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. एखादे ‘कपल’वेगळे झाल्यानंतर त्याचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर फुटतेच. असे खापर महाराष्ट्रातील ‘ब्रेकअप’नंतर आपल्यावर विरोधकांनी उगाच फोडू नये, याची चिंताही काहीशी पटोले यांना सतावत आहे.
विवाह मांडवातून अचानक वधू गायब झाल्यानंतर जसे पाठीमागे शिल्लक राहणारे नातेवाईक पळून जाणाऱ्या जोडप्यांचा ठावठिकाणा घेतात, अगदी त्याच पद्धतीने सध्या काँग्रेसश्रेष्ठी आपला प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता जागेवर आहे ना? याची सतत फोन करून खात्री करून घेत आहेत. ‘हायकमांड’ थेट दिल्लीवरून हे फोन करीत आहेत. हेतू एकच की घोडा, गाडी सजलेली असताना आणि सगळे ‘सावधान’ म्हणण्याच्या तयारीत असताना अचानक बेपत्ता झालेल्या ‘तिला’ परत आणता येते का? नाहीच तर उरलेल्या वऱ्हाड्यांची तरी समजूत घालून त्यांना थोपविता येते का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.