sarkarnama
विदर्भ

ईडी, पाऊस राष्ट्रवादीसाठी 'लकी' : सुप्रिया सुळे

पाचशे मीटर अंतरावर राष्ट्रवादी शहर आणि ग्रामीणचा मेळावा वेगवेगळा पार पडला.

प्रमोद काकडे

चंद्रपूर : आमचे सरकार दडपशाहीचे नाही. लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. पवार कुटुंबीयांवर पन्नास वर्षांपासून आरोप होत आहे. आमच्या विरोधात ट्रकभर पुरावे होते. ते कधीच समोर आले नाही. लहान असताना या आरोपांचा त्रास व्हायचा. काही लोकांना प्रसिद्धीसाठी आरोप करण्याची सवय झाली आहे. आपल्यावरील आरोपांमुळे एखादी व्यक्ती मोठी होत असेल तर आनंदच आहे. तसेही ईडी (ED) आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी 'लकी' आहे, या शब्दात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विरोधकांना टोला लगावला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे बेहीशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्याचे नाव न घेता त्यांच्या आरोपांची खिल्ली खासदार सुळे यांनी उडविली. चंद्रपुरात आज (ता. १७) राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा जनता महाविद्यालयात खासदार सुळेंच्या उपस्थितीत पार पडला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजीवर त्यांनी भाष्य केले. पाचशे मीटर अंतरावर राष्ट्रवादी शहर आणि ग्रामीणचा मेळावा वेगवेगळा पार पडला. शहर आणि ग्रामीणचे मेळावे वेगवेगळे घेण्यात काहीच हरकत नाही.

पक्षवाढीसाठी ते फायदेशीर आहे. संघटनेत मतभेद असतात. ते चर्चा करून सोडविले पाहिजे असे सांगत या दोन्ही कार्यक्रमांची त्यांनी पाठराखण केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे विदर्भात पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षातील सहकारी अडचणीत असताना त्यांच्यापाठीशी उभे राहणे पक्ष म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे. पक्षाच्या स्थापनेपासून विदर्भात राष्ट्रवादीला फारसा जनाधार मिळाला नाही. हा नेत्यांचा नाकर्तेपणा आहे. यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही. यश नेत्यांचे असते तर अपयशाचे वाटेकरी सुद्धा नेतेच असायला पाहिजे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

मी लोकसभेची खासदार आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एखादी महिला असावी हा विषय माझ्यासाठी नाही. मुळात पुरूष आणि महिला असा भेदच करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही चौकश्यांना घाबरणार नाही. गैरव्यवहार, बेहीशोबी मालमत्तेचे पुरावे असेल तर संबंधित यंत्रणेकडे द्यावे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ईडी लावली. त्यांचा फायदाच झाला. राज्यात सत्ता आली. ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी फायद्याची आहे, अशी मिश्किल टिप्पणी एका प्रश्नाच्या उत्तरात साखदार सुळे यांनी केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, माजी खासदार सुबोध मोहीते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT