Vinod Agrawal, Prafull Patel Sarkarnama
विदर्भ

आमदार अग्रवाल म्हणाले, प्रफुल्ल पटेलांमुळेच मी आमदार होऊ शकलो…

प्रफुल्ल पटेलांमुळेच (Prafull Patel) मी आमदार होऊ शकलो, असे विधान त्यांनी नुकतेच केले. त्यामुळे ते हातात घड्याळ (NCP) घालणार, असे सांगितले जात आहे.

Abhijeet Ghormare

भंडारा : भारतीय जनता पक्षासोबत (BJP) बंडखोरी करून गोंदियाचे (Gondia) आमदार झालेले विनोद अग्रवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू आहे. कारण प्रफुल्ल पटेलांमुळेच (Prafull Patel) मी आमदार होऊ शकलो, असे विधान त्यांनी नुकतेच केले. त्यामुळे ते हातात घड्याळ घालणार, असे सांगितले जात आहे.

आमदार अग्रवाल राष्ट्रवादीत (NCP) गेल्यास मोठी राजकीय उलथापालथ होऊन जिल्हा परिषद (ZP) अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११६व्या जयंती उत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर चांगलीच भडास काढली. ते म्हणाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अनेक वर्ष भाजपमध्ये काढली. इमानेइतबारे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन कार्य करीत राहिलो. पण तेथील गटबाजीचा फटका मला बसला. त्यामुळे त्या पक्षात मला संधी मिळाली नाही.

गोंदिया विधानसभेत जनसेवक बनून कार्य करण्याची माझी इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि ती भविष्यात होणारही नाही, याची जाणीव झाल्यामुळे मी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मला मोठी मदत केली. त्यांच्यामुळेच मला गोंदिया विधानसभा मतदार संघाचा आमदार होण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमदार झाल्यानंतर घेतलेल्या शपथेनुसार मी माझ्या मतदारसंघातील जनतेसोबत प्रामाणिक आहे. येथे आणखी मोठमोठी कामे करायचे आहेत, असेही आमदार अग्रवाल म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याच्या स्थितीत भाजप आज आहे. अध्यक्षपद केवळ एक हात दूर आहे. अशा परिस्थितीत आमदार अग्रवाल राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेल्यास जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. भाजपच्या बंडखोर आमदाराच्या समर्थनाच्या बळावर जिल्हा परिषदेचे राजकारण भाजपकडून जोडले जात आहे. पण आमदार अग्रवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यास जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार, हे निश्‍चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT