MLA Amol Mitkari Protest in Akola Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkar on Road : हॉकर्सला त्रास मनपाचा, आमदारानं रस्ताच रोकला साऱ्यांचा

Protest : ऐन दिवाळीच्या गर्दीत अमोल मिटकरींच्या आंदोलनानं पोलिसांची दमछाक

जयेश विनायकराव गावंडे

Akola Corporation & Police in Trouble : उत्सवाच्या काळात रस्त्यांना अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अकोला शहरात महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं सुरू केलेली मोहीम त्यांना आमदाराच्या आंदोलनामुळं थांबवावी लागली. हॉकर्सला झालेल्या त्रासामुळं संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी (ता. ९) शहरातील साऱ्यांचाच रस्ता रोकला.

दिवाळी जवळ आल्यानं अख्खं अकोला खरेदीसाठी घराबाहेर पडलं असताना शहरातील चांदेकर चौकात आमदार मिटकरी यांनी हॉकर्ससोबत ठिय्या दिला. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळं बस स्थानक ते लोखंडी पुलापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. थोड्या वेळानं आंदोलन थांबलं, पण नंतर वाहतूक सुरळीत करता करता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. (MLA Amol Mitkari protest Against Akola Corporation & Police to stop Action on Hawkers Till Festive Season)

उत्सवाचा काळ जवळ आल्यानं अकोल्यातील बाजारपेठेत गर्दी वाढलीय. कोतवाली पोलिस ठाणे ते चांदेकर चौक, चांदेकर चौक ते काश्मीर लॉज, तहसील कार्यालय ते ताजनापेठ या भागात छोट्या विक्रेत्यांनी रस्त्यांवर दुकानं लावली आहेत. अकोला शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यातच रस्त्यांवर हॉकर्स असल्यानं वाहतूक कोंडी होते. परिणामी महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं हॉकर्सवर कारवाई सुरू केलीय.

महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक सातत्यानं शहरातील या मार्गांवरून गस्त घालतेय. त्यांच्या पाठोपाठ पोलिसांची वाहनेही येतात व हॉकर्सला बाजूला करतात. त्यामुळं संतापलेल्या हॉकर्सनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडं धाव घेतली. आमदार मिटकरी यांनी चांदेकर चौक गाठत हॉकर्सशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी हॉकर्ससह चांदेकर चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनाला सुरुवात झाल्यानं चारही दिशेनं वाहतूक ठप्प झाली. कुणीतरी पोलिस नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती दिल्यानंतर कोतवाली पोलिस, दंगल नियंत्रण पथक असा ताफा चांदेकर चौकात पोहोचला. पोलिस येऊन पाहतात तर आमदार महोदयांनीच हॉकर्सला घेऊन रास्ता रोको सुरू केलं होतं. आमदारांना पाहून पोलिसांनाही हॉकर्सवर कारवाई करता येईल. त्यामुळं त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावलं.

महापालिकेचे उपायुक्त चांदेकर चौकात दाखल झालेत. आमदार मिटकरी यांनी उत्सवांचा काळ असल्यानं प्रत्येकालाच पोट भरण्यासाठी व्यवसाय करणं गरजेचं आहे असं सांगितलं. किमान उत्सवाच्या काळात तरी महापालिका आणि पोलिसांनी अतिरेकी कारवाई करू नये, असं मिटकरी अधिकाऱ्यांना म्हणाले. उपायुक्तांनी व्यावसायिकांना त्रास होणार नाही, परंतु व्यावसायिकांमुळं वाहतुकीलाही त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. महत्त्वाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यानं आमदार मिटकरी व आंदोलक चांदेकर चौकातून निघून गेले. मात्र, या आंदोलनामुळं सुमारे साडेतीन ते पावणेचार वाजताच्या सुमारास झालेली वाहतूक कोंडी सोडवता सोडवता पोलिसांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत कसरत करावी लागली.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT